27 वर्षांनंतर दहा दिवसांचा नवरात्रोत्सव, मुंबईतील शक्तिपीठे सज्ज; महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरांत चोख बंदोबस्त

आदिशक्ती आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यंदा तृतिया तिथीच्या वृद्धीमुळे हा उत्सव दहा दिवसांचा असणार आहे. त्यामुळे देवीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरातील प्रमुख देवी मंदिरे विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीसह सज्ज झाली आहेत. मुंबईतील श्री महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरात चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईतील महालक्ष्मी मंदिरामध्ये रांगेची व्यवस्था करतानाच सुरक्षेच्या कारणास्तव 77 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रांगेत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिरामध्ये डॉक्टरांचे पथक सज्ज असून, प्रथमोपचार पेटीची तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाने केली आहे. प्रत्येक भाविकाला मेटल डिटेक्टरमधून प्रवेश करावा लागेल. त्यांच्याकडे असलेल्या सर्व वस्तू व बॅग, पर्स या स्पॅनरमधून स्पॅन करून घेणे आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. उत्सव काळात मंदिरामध्ये येणाऱया भाविकांसाठी विशेष बसेसची सोय बेस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
उत्सव काळात श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी दररोज पहाटे 5.30 वाजता उघडणार असून, रात्री 10 वाजता बंद होईल, सकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत आरतीसाठी, दुपारच्या नैवेद्यासाठी 12 ते 12.20 पर्यंत, सायंकाळची धुपारती 6.30 ते 6.40 वाजेपर्यंत त्यानंतर सायंकाळच्या आरतीसाठी 7.30 ते 8 या काळात मंदिर गाभारा दर्शनासाठी बंद राहील.
मुंबादेवी मंदिरात दीपोत्सव, चंडी महायज्ञ
मुंबादेवी मंदिराची नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबादेवी मंदिरात 22 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता घटस्थापना होईल. 26 नोव्हेंबर रोजी ललिता पंचमी असून दीपोत्सव सायंकाळी 6 ते 6.30 दरम्यान आहे. तसेच नवमीला 1 ऑक्टोबर रोजी श्री चंडी महायज्ञ होणार आहे.
घटस्थापनेचा मुहूर्त
अमृत मुहूर्त – सकाळी 6.19 ते 7.49
शुभ मुहूर्त – सकाळी 9.14 ते 10.49
अभिजित मुहूर्त – सकाळी 11.55 ते 12.43 सायंकाळी ः 6.27 ते 7.57
Comments are closed.