‘त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी..’, सरफराजबद्दल शार्दुल ठाकूरचा मोठा खुलासा! जाणून घ्या काय म्हणाला

भारतीय स्टार फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये पुनरागमनाची वाट पाहत आहे. सरफराज शेवटच्या नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी खेळला होता आणि त्यानंतर तो टीममधून बाहेर आहे. मात्र, तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे आणि चांगली कामगिरीही करत आहे.

पण जेव्हा सरफराजचं नाव दक्षिण आफ्रिका ‘ए’ विरुद्ध होणाऱ्या आगामी दोन चारदिवसीय सामन्यांसाठी इंडिया-ए संघात नव्हतं, तेव्हा चाहत्यांना धक्का बसला. सरफराजची निवड न झाल्यामुळे मोठं वादळ उठलं आणि अनेक माजी खेळाडूंनी आपली वेगवेगळी मतं व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur on sarfaraz khan) सरफराजबद्दल मोठं विधान केलं आहे.

माध्यमांशी बोलताना शार्दुल म्हणाला, आजकाल इंडिया-ए संघात अशा खेळाडूंवर लक्ष दिलं जातं, ज्यांना ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करत असतात. पण सरफराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी इंडिया-ए साठी खेळण्याची गरज नाही. जर तो पुन्हा धावा करू लागला, तर तो थेट कसोटी मालिकेतही खेळू शकतो.

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणारा सरफराज खान जम्मू-काश्मीरविरुद्ध दोन्ही डावांत मोठी खेळी करण्यास चुकला. मात्र, त्याच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली. सरफराजच्या अलीकडच्या कामगिरीबद्दल शार्दुल म्हणाला,
तो सध्या दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. पण दुखापतीपूर्वी त्याने बुची बाबू ट्रॉफीमध्ये दोन-तीन शतकं झळकावली होती. आणि जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात परत येत त्याने 42 धावांची उत्तम खेळी केली होती. रन आऊट होणं दुर्दैवी होतं. पण मला वाटतं, त्याच्यासाठी इंडिया-ए साठी खेळणं तितकंसं आवश्यक नाही.

Comments are closed.