शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा…
शेअर मार्केट क्रॅश नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरु झाल्यानं भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत दीड टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, नंतर त्यामध्ये घसरण झाली. अमेरिकेनं इराणमधील काही ठिकाणांवर केलेले हल्ले, इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये सुरु असलेले हल्ले यामुळं शेअर बाजारातील तेजी ओसरुन घसरणीचा ट्रेंड सुरु झाला. सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टी निर्देशांक 23700 वरुन घसरुन 23400 च्या खाली आला.
भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स 508 अंकांनी घसरुन 74267.34 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 165.15 अकांनी घसरुन 23383.60 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सनं दिवसभरात इंट्राडे दरम्यानं 75367 अंकांपर्यंत झेप घेतली होती. मात्र, नंतर त्यात घसरण झाली. तर, निफ्टी 50 देखील 23733 अंकांवर पोहोचला होता. भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणकदारांचं 3.75 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 3.75 लाख कोटींनी कमी झालं.
शेअर बाजारात आज आयटी सेक्टरनं मार्केट सावरण्याचा प्रयत्न केला. निफ्टी आयटी अखेरपर्यंत मजबूत राहिला. निफ्टी एफएमसीजीमध्ये अडीच टक्क्यांची घसरण झाली. तर, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी ऑटोमध्ये 2-2 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी रिअल्टी 2 टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी बँक 1 टक्क्यांनी घसरला आहे.
गुंतवणूकदारांचे पावणे चार लाख कोटी बुडाले
29 मे रोजी शेअर बाजारात बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 464 कोटींवर होतं. आज बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 460 लाख कोटींवर आलं आहे. जवळपास 3 लाख 74 हजार कोटींनी आज बाजारमूल्य कमी झालं आहे.
सेन्सेक्सवरील टॉप 30 कंपन्यांपैंकी 6 कंपन्या तेजीसह बंद झाल्या. तर 24 कंपन्याच्या शेअरमध्ये आज घसरण झाली. सर्वाधिक तेजी टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएसच्या शेअरमध्ये दिसून आली. तर सर्वाधिक घसरण एचयूएल, आयटीसी आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये झाली.
बीएसईवर आज 4549 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यामध्ये 1589 शेअर तेजीसह बंद झाले तर 2761 शेअरमध्ये घसरण झाली. 199 स्टॉकमध्ये घसरण किंवा तेजी पाहायला मिळाली नाही.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.