Share Market News – शेअर बाजाराचे कभी उपर…कभी नीचे सुरूच; गुंतवणूकदारांचा संभ्रम वाढला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल- इराण युद्धामुळे जागतिक अस्थिरता वाढत आहे. त्यातच तेलाच्या वाढत्या दरामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठे संकट घोंघावत आहे. तसेच अनेक शेअर बाजार दबावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदुस्थानी शेअर बाजारातही युद्ध सुरू झाल्यापासून मोठी घसरण झाली आहे. ऑल टाईम हायपासून निफ्टी सुमारे तीन हजार अंकांनी कोसळला आहे. तर दुपारच्या सत्रानंतर बाजारात जबरदस्त उसळी दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा संभ्रम आणखी वाढला आहे.

देशाचा राष्ट्रीय निर्देशांक ‘निफ्टी ५०’ एप्रिल २०२५ नंतर प्रथमच २३,००० अंकांच्या खाली घसरला. त्यामुळे सोमवारी बाजारात विक्रीचा सिलसिला राहिला. व्यवहारादरम्यान हा निर्देशांक १९६ अंकांनी किंवा ०.८५ टक्क्यांनी घसरून २२,९५५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे बाजाराच्या भांडवली मूल्यात (market capitalisation) तब्बल १.७ लाख कोटी रुपयांची घट झाली.

आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ, जागतिक बाजारातील कमकुवत संकेत, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेली सततची विक्री, रुपयाचे अवमूल्यन आणि ‘India VIX’ द्वारे मोजली जाणारी वाढती अस्थिरता या घटकांमुळे बाजारात मोठी घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ५ टक्क्यांहून जास्त घसरण नोंदवली गेली. जून २०२२ नंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली.

शुक्रवारी परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) १०,७१७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर गेल्या संपूर्ण आठवड्यात त्यांनी ३५,००० कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली. बाजार २३,५०० च्या खाली व्यवहार करत आहे, तोपर्यंत बाजारातील कमकुवत स्थिती (weak formation) कायम राहण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

शेअर बाजारात पहिल्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली आहे. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 774.82 अंकांच्या म्हणजेच 1.04% वाढीसह 75,394.02 वर व्यवहार करत होता . तर निफ्टी 154.65 अंकांच्या म्हणजेच 0.67% वाढीसह 23,146 . 45 वर व्यवहार करत आहे. बाजारातील या चढउतारांमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम वाढत आहे.

Comments are closed.