शेअर बाजारात 2 दिवसात 11 लाख कोटी बुडाले, म्युच्युअल फंडमधील SIP बंद करावी की सुरु ठेवावी?

नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दोन दिवसात भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. गुंतवणूकदारांनी तब्बल 11 लाख कोटी रुपये दोन दिवसात गमावले आहेत. आर्थिक आणि भूराजनैतिक तणाव वाढताच गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात. सेन्सेक्स आणि निफ्टीतही मोठी घसरण झालीय. यामुळं गुंतवणूकदारांच्या मनात एसआयपी सुरु ठेवावी की बंद करावी, असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर निर्माण झाला आहे.

भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत 2.5 टक्क्यांची घट झाली आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकामध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1048 अंकांनी घसरुण 81 हजारांच्या खाली आला तर निफ्टी 50 निर्देशांक 300 अंकांनी घसरुन 25 हजारांच्या खाली आला.

तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात गोल्ड फ्युचर्समध्ये तेजी दिसू शकते. म्हणजेच सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढेल. कच्चा तेलाच्या दरात देखील वाढ झाल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून येईल. अँथ्रोपिकच्या क्लाउड एआय मॉडेलमुळं अगोदरच आयटी स्टॉक्स कोसळलेले आहेत.

जीडीपी आणि जीएसटी कलेक्शनची आकडेवारी पाहता भारताची स्थिती चांगली असल्याचं दिसून येतं. युद्ध संपल्यानंतर आणि एआयचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी दिसू शकते, असा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यातील बाजाराचा शेवटचा दिवस म्हणजेच 27 फेब्रुवारीला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 7536 कोटी रुपयांची विक्री केली होती. तर, त्याच दिवशी भारतातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 12293 कोटी रुपयांची खरेदी केली होती. तज्ज्ञांच्या मते सध्या गुंतवणूकदारांनी घाबरुन जाऊ नये, शिस्तबद्ध गुंतवणूक सुरु ठेवणं आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक संधी आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं दीर्घकालीन उद्देश डोळ्यासमोर ठेवत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांना सतर्कता बाळगली पाहिजे. भारतात सक्रिय एसआयपी खात्यांची संख्या 9.92 कोटी इतकी आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.