शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई
आज शेअर बाजार: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 283.29 अंकांच्या तेजीसह 83734.25 अंकांवर होता. दुसरीकडे निफ्टी 93.95 अंकांच्या तेजीसह 25819.35 वर बंद झाला. सुरुवातीच्या काळात बाजारात विक्रीचं सत्र पाहायला मिळाल्यानं निफ्टीमधील घसरण 25645.15 अंकांपर्यंत पोहोचली होती. मात्र, दुपारी शेअर बाजारात पुन्हा खरेदी सुरु झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले.
भारतीय शेअर बाजारात लार्ज कॅप शेअरच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरन चांगली कामगिरी केली. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयटी निर्देशांक वगळता इतर सेक्टोरल निर्देशांक तेजीत बंद झाले. मेटल, एफएमसीजी आणि पीएसयू बँक निर्देशांकात 1 टक्क्यांची तेजी दिसून आली. प्रायव्हेट बँक,रिअल्टी, ऑटो आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात 0.5 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांकात 1.2 टक्क्यांची तेजी दिसून आली.
गुंतवणूकदारांची 1.78 लाख कोटींची कमाई
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 471.89 लाख कोटींवर पोहोचलं आहे. मंगळवारी बीएसईचं बाजारमूल्य 470.11 लाख कोटी होतं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.78 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.78 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बीएसईवरील टॉप 30 शेअर पैकी 18 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. आयटीसी, एक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 1.18 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, इटरनल, इन्फोसिस, अदानी पोर्टस आणि एचसीएल टेकच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
बीएसईवर लिस्ट असलेल्या 4383 शेअरमध्ये आज ट्रेडिंग झालं. 2243 शेअरमध्ये तेजी दिसून आली तर 1952 शेअरमध्ये घसरण झाली. 188 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झालेली नाही. 112 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 100 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.