तीन दिवसात सेन्सेक्सवर 1900 अंकांची तेजी, निफ्टी मजबूत, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिलासा
Stock Market News: दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारात तेजी असल्यानं गुंतवणकदारांना दिलासा मिळाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीनं उच्चांक गाठला आहे. निफ्टी 50 नं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. तर, सेन्सेक्समध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये 1900 अंकांची तेजी पाहायला मिळाली आहे. यामुळं शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये यंदा जवळपास 4.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रामुख्यानं बँकिंग शेअरमध्ये तेजी आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली नवी गुंतवणूक आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरातील कपातीच्या आशेनं सकारात्मक जागतिक संकेतामुळं तेजी आली आहे. यामुळं शेअर बाजारावरील गुंतवणूकादारांचा विश्वास वाढला आहे.

या आठवड्यात निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये अनुक्रमे 1.7 टक्के आणि 1.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. निफ्टी 50 शुक्रवारी 25710 अंकांवर आणि सेन्सेक्स 83952 अंकांवर बंद झाला.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आयपीओ देखील नुकताच लिस्ट झाला. एलजी इंडियाचा आयपीओ 50 टक्के प्रीमियमसह 1710.1 रुपयांवर लिस्ट झाला. यामुळं ज्यांना आयपीओ लागला ते मालामाल झाले आहेत.

भारतीय शेअर बाजारातील तेजीचं कारण संस्थात्मक गुंतवणूक वाढणं ही आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात 16247 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 556 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

बँकिंगसह रिअल्टी, हेल्थकेअर क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिकेनं नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्यापार करार पूर्ण करण्यावर सहमती दर्शवली आहे. यामुळं गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढला आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 19 ऑक्टोबर 2025 05:50 PM (IST)
Comments are closed.