अमेरिका- इराण युद्धाची भारताला झळ, विदेशी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये 88 हजार कोटी काढून घेतले
नवी दिल्ली : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका इतर देशांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळतंय. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळं क्रूड ऑईल आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळं क्रूड ऑईलचे दर वाढले आहेत. यामुळं युद्धाची झळ जगभरातील विविध देशांना बसली आहे. सध्या अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होऊ लागल्यानं ऊर्जासंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम विविध देशांच्या शेअर बाजारावर झाला आहे. भारतीय सेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत.
मार्च महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 88 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामुळं शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.
अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतीय रुपया कमजोर होऊन डॉलर मजबूत झाला आहे. यामुळं विदेशी गुंतवणूकदार सतर्क झाले आणि विदेसी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 52704 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. तर, आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारंनी मार्च महिन्यात तब्बल 88180 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
मार्च महिन्यात विदेशी गुंतवणूकदार प्रत्येक दिवशी शेअरची विक्री करुन पैसे काढून घेत आहेत. मार्च महिन्याच्या तीन आठवड्यात 88180 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करुन विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले आहेत.2026 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी तब्बल 1 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी महिन्यात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. त्यापूर्वी तीन महिने एफपीआयनं पैसे काढून घेतले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये 3765 कोटी, डिसेंबर 2025 मध्ये 22611 कोटी आणि जानेवारी महिन्यात 35962 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करुन एफपीआयनं पैसे काढून घेतले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एफपीआयनं 22615 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याची अनेक कारणं आहेत. आखाती देशांमध्ये युद्ध सुरु झाल्यानं क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली आहे. सध्या क्रूड ऑईलचे दर 112 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. भारतीय रुपयात सुरु असलेल्या घसरणीमुळं देखील विदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 93 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या सर्व कारणांमुळं विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. सर्वाधिक फटका वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.