मुख्यमंत्र्यांसह मोदीसमवेत थारूरही मंचावर आहेत.

‘आज अनेक लोकांची झोप उडाली असेल’ : पंतप्रधानांचे सूचक वक्तव्य

वृत्तसंस्था/ तिरुवनंतपुरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळमध्ये 8,900 कोटी रुपयांच्या ‘विझिंजम आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय बंदरा’चे उद्घाटन केले. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही टीका केली. यावेळी त्यांनी शशी थरूर आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांवरही भाष्य केले. मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की तुम्ही इंडि युतीचे खूप मोठे आधारस्तंभ आहात, शशी थरूर देखील येथे बसले आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार आहे. संदेश जिथे पोहोचायला हवा होता तिथे गेला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी शशी थरूर यांच्याशी हस्तांदोलन केले आणि काही वेळ स्टेजवर राहून त्यांच्याशी संवाद साधला.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी आज भगवान आदि शंकराचार्य यांची जयंती असल्याचे सांगितले. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबरमध्ये मला त्यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याचा मान मिळाला. माझ्या संसदीय मतदारसंघ काशीमधील विश्वनाथ धाम संकुलात आदि शंकराचार्यांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे याचा मला आनंद असल्याचे ते पुढे म्हणाले.

विझिंजम बंदर – भारताचे गेमचेंजर

केरळच्या तिरुवनंतपुरम जिह्यातील विझिंजम बंदर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंगमध्ये भारताची भूमिका बदलण्याची अपेक्षा आहे. विझिंजम हे भारतातील पहिले समर्पित ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे. तसेच ते देशातील पहिले सेमी-ऑटोमॅटिक पोर्टदेखील आहे. हे एका प्रमुख आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गापासून फक्त 10 नॉटिकल मैल अंतरावर आहे. तेथे नैसर्गिकरित्या खोल पाणी असल्यामुळे ते मोठ्या मालवाहू जहाजांसाठी आदर्श बनते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले विझिंजम बंदर गौतम अदानी यांच्या कंपनीने बांधले आहे. कंपनीने 5 डिसेंबर 2015 रोजी काम सुरू केले होते.

शशी थरूर भाजपच्या गोटात?

पंतप्रधानांनी केलेल्या सूचक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर केरळमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा बनतील का? यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान अवघ्या काही तासांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विझिंजम बंदराच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या 15 लोकांपैकी फक्त शशी थरूर यांच्याशी हस्तांदोलन केले. तसेच काही क्षण दोघांमध्ये संवादही झाला.

Comments are closed.