शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत अखेर पतीने सोडले मौन…
अभिनेत्री शेफाली जरीवालाचा २७ जून, २०२५ रोजी आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. शेफालीचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झाले. शेफालीच्या मृत्यूबाबत माध्यमांमधून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अभिनेत्री सौंदर्यवर्धक इंजेक्शन घेत असल्याचा दावा अहवालांमध्ये करण्यात आला होता. आता पराग त्यागीने म्हणजेच शेफालीच्या पतीनेच तिच्या मृत्यूबाबत मौन सोडले आहे.
शेफालीच्या मृत्यूनंतर असे म्हटले गेले की तिने उपाशीपोटी सौंदर्यवर्धक इंजेक्शन घेतले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत परागने या अफवा फेटाळून लावल्या. तो म्हणाला, “आम्ही सर्व काही खातो. आम्हाला स्वतःला उपाशी ठेवण्याची काय गरज आहे?” शेफालीबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती तिच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर सर्वात फिट होती.” शेफालीने गोरेपणा किंवा तारुण्य टिकवण्यासाठी इंजेक्शन घेतल्याच्या अफवा देखील परागने फेटाळून लावल्या. पराग यावर म्हणाला, “तिला अधिक गोरे होण्याची काय गरज होती? कोणत्या प्रकारचे इंजेक्शन तुम्हाला तरुण ठेवते. जर हे सर्व खरे असते तर रतन टाटा अजूनही जिवंत असते.”असे वृत्त आजतक ने दिले आहे.
पराग म्हणाला की शेफालीचा मृत्यू अटळ होता आणि त्याने हे सत्य स्विकारले आहे. आता तो त्यासोबत शांततेत जगत आहे. या विषयावर अधिक बोलताना पराग म्हणाला, भले आम्ही कमी काळ एकत्र होतो, तरी आमचा आत्मा मात्र एकमेकांशी कायमच जोडलेला राहिल. यावर पुढे बोलताना तो म्हणाला, कृपया लोकांनी शेफालीबाबत कोणत्याही अफवा पसरवु नका.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत परागने खुलासा केला की, त्याचा पाळीव कुत्रा सिम्बा कठीण काळात त्याचा भावनिक आधार बनला. तो म्हणाला, “त्याची शारीरिक उपस्थिती आणि स्पर्श भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत.”
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ‘कांटा लगा गर्ल’ला हृदयविकाराचा झटका आला होता. शेफालीने यापूर्वी मुलाखतींमध्ये सांगितले होते की तिला लहान वयातच अपस्माराचा त्रास होता. वयाच्या १५ व्या वर्षी तिला पहिल्यांदा अपस्माराचा झटका आला होता. अनेक आजारांशी झुंज देऊनही, शेफाली वयाच्या ४२ व्या वर्षीही तंदुरुस्त दिसत होती. त्यामुळेच तिच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Comments are closed.