संघातून बाहेर, वडिलांना हार्ट अटॅक; तुटलेली शेफाली वर्मा एका कॉलने बनली विश्वविजेती!
म्हणतात ना, “वेळ येताच सगळं मिळतं, त्याआधी नाही.” भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर शेफाली वर्माने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी शेफालीने हे खरं ठरवलं आहे. तिने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेफालीने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दोन्ही मध्ये अप्रतिम कामगिरी करत भारताला 52 वर्षांनंतर विश्वविजेतेपद मिळवून दिलं.
उपांत्य फेरीपूर्वी शेफाली वर्मा संघात नव्हती. प्रतिका रावल दुखापतीमुळे बाहेर पडल्याने शेफालीला तातडीने संघात संधी मिळाली. ती थेट उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध उतरली. त्या सामन्यात तिचं काही विशेष योगदान नव्हतं. पण अंतिम फेरीत शेफालीने आपल्या दमदार कामगिरीने संपूर्ण क्रिकेटविश्वाला चकित केलं.
फायनलमध्ये शेफालीने 78 चेंडूत 87 धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. तिच्या या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर गोलंदाजीतही तिने चमक दाखवत 7 षटकांत फक्त 36 धावा देत 2 निर्णायक विकेट्स घेतल्या, तिच्या सर्वांगीण खेळीमुळे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.
शेफाली वर्माने भारतीय संघात पदार्पण करताच तिच्या आक्रमक फलंदाजीची तुलना वीरेंद्र सेहवागशी केली जाऊ लागली. पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करण्याची तिची वृत्ती बघून ती चर्चेत आली. मात्र, हाच आक्रमक खेळ तिच्या करिअरसाठी अडथळा ठरला. फॉर्म गमावल्यामुळे 2024 मध्ये तिला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी संघातून वगळण्यात आलं.
त्या काळात तिच्या आयुष्यात कठीण प्रसंग आले. संघातून वगळल्यानंतर दोन दिवसातच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. शेफालीने ही बातमी वडिलांपासून काही दिवस लपवून ठेवली. एका बाजूला क्रिकेट कारकिर्दीत उतार आणि दुसऱ्या बाजूला घरचं संकट पण शेफाली हार मानली नाही. तिने स्थानिक क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि आपल्या फिटनेस व फॉर्मवर लक्ष केंद्रित केलं. या मेहनतीचं फळ आज तिला मिळालंं आहे.
Comments are closed.