वाइल्ड कार्ड एंट्री अन् सुवर्ण कामगिरी, शेफाली वर्माला आयसीसीकडून खास पुरस्काराने सन्मान
महिला वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय सलामीवीर शेफाली वर्माला आयसीसीकडून नोव्हेंबर महिन्याचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्यानंतर सेमीफायनलपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणाऱ्या शेफालीने अंतिम सामन्यात 78 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी केली. महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय सलामीवीराकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. नवी मुंबईत झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने 7 बाद 298 धावा उभारल्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले.
शेफालीने स्मृती मंधानासोबत पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. 21 वर्षीय शेफालीने थायलंडच्या थीपैचा पुथावोंग आणि यूएईच्या ईशा ओझा यांना मागे टाकत पहिल्यांदाच महिन्याच्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात शेफाली म्हणाली, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील माझा पहिला अनुभव अपेक्षेप्रमाणे नव्हता, मात्र शेवट माझ्या कल्पनेपलीकडे आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी चांगला ठरला. अंतिम सामन्यात संघाच्या यशात योगदान देता आले याचा मला अभिमान आहे.”
तिने पुढे सांगितले, “नोव्हेंबर महिन्याची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड झाल्याचा मला सन्मान वाटतो. हा पुरस्कार मी माझ्या सहकाऱ्यांना, प्रशिक्षकांना, कुटुंबाला आणि आजवर साथ देणाऱ्या सर्वांना समर्पित करते. आम्ही संघ म्हणूनच जिंकतो आणि हरतो.”
दरम्यान, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सायमन हार्मरला पुरुष गटातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाला. हार्मरच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेला भारतात तब्बल 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकता आली.
हार्मरने बांगलादेशच्या तैजुल इस्लाम आणि पाकिस्तानच्या अष्टपैलू मोहम्मद नवाज यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण 17 विकेट घेतल्या. कोलकात्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत चार-चार, तर गुवाहाटीत पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. या मालिकेत त्याची सरासरी 8.94 आणि इकॉनॉमी 1.91 अशी राहिली.
Comments are closed.