या बाबतीत शेफाली वर्माने स्मृती मानधनाला मागे टाकले; यादीत मिताली राज अव्वल
INDW vs SLW: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 विकेटने पराभव केला. या सामन्यात शफाली वर्माने टीम इंडियासाठी 69 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तिच्या या इनिंगमुळे टीम इंडियाने 129 धावांचे लक्ष्य सहज गाठले. शफालीने ही खेळी 34 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह सुमारे 203 च्या स्ट्राईक रेटने खेळली. यासाठी तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यासह, शफालीने भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या स्मृती मानधनाला मागे टाकले आहे.
स्मृती मानधनाने टी-20 मध्ये सात वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार’ जिंकला आहे. जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनीही प्रत्येकी सात वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. माजी भारतीय कर्णधार मिताली राज या यादीत अव्वल आहे. हरमनप्रीत काैर दुसऱ्या स्थानावर आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत 12 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने आतापर्यंत 11 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. हरमनप्रीत कौरला मिताली राजचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
टी20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय महिला खेळाडू
12- मिताली राज
11- हरमनप्रीत कौर
८ – शेफाली वर्मा
7 – स्मृती मानधना
7- दीप्ती शर्मा
7 – जेमिमा रॉड्रिग्ज
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर शफाली वर्मा म्हणाली, “सुरुवातीला चेंडू थोडा हळू येत होता, म्हणून मी अधिक एकेरी घेण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत कसे खेळायचे हे देखील प्रशिक्षकाने मला सांगितले. माझ्यासाठी ही एक चांगली खेळी होती. मी या खेळीदरम्यान स्वतःला शांत ठेवले आणि चेंडू जास्त उंच मारण्याचा प्रयत्न केला नाही.” मला माहित आहे की मी ग्राउंड शॉट्स खेळले तरीही मी धावा करू शकते.
दुसऱ्या टी20 सामन्यात, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 128 धावा केल्या आणि भारतासमोर 129 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून वैष्णवी आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाने हे लक्ष्य फक्त 11.5 षटकांत पूर्ण केले. टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
Comments are closed.