6,6,6,6,6,6… 2025 च्या अखेरच्या दिवशी क्रिकेटमध्ये उलथापालथ; या खेळाडूंनी सलग 6 षटकारांनी मैदान गाजवलं!
नववर्षाच्या जल्लोषात संपूर्ण जग रमले असताना, दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानावर डेवाल्ड ब्रेविस आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. SA20 लीग 2025-26 मधील 8व्या सामन्यात प्रीटोरिया कॅपिटल्सकडून खेळताना या दोघांनी मिळून सलग 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकत गोलंदाजांना घेरलं. हा थरार एमआय केपटाउनविरुद्ध पाहायला मिळाला.
प्रीटोरिया कॅपिटल्सच्या डावातील 18व्या षटकात हा अद्भुत प्रकार घडला. हे षटक कॉर्बिन बॉश टाकत होता. या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविसने सलग दोन षटकार ठोकले. त्यानंतर स्ट्राइक बदलली आणि शेरफेन रदरफोर्ड क्रीजवर आला. पुढील 19वे षटक ड्वेन प्रिटोरियस टाकत होता आणि रदरफोर्डने या षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर एकापाठोपाठ एक चार षटकार लगावत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. अशा प्रकारे ब्रेविस आणि रदरफोर्ड यांनी मिळून 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचल्या.
फक्त या षटकारांपुरतेच त्यांचे योगदान मर्यादित राहिले नाही. डेवाल्ड ब्रेविसने केवळ 13 चेंडूत नाबाद 36 धावांची तडाखेबाज खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. तर शेरफेन रदरफोर्डने 15 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त विहान लुबेने 36 चेंडूत 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर शाई होपने 30 चेंडूत 45 धावा केल्या. या दमदार फलंदाजीच्या जोरावर प्रीटोरिया कॅपिटल्सने 20 षटकांत 5 बाद 220 धावांचा भक्कम डोंगर उभा केला.
221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय केपटाउनची सुरुवात चांगली झाली होती. रायन रिकेल्टन आणि रसी व्हॅन डर ड्युसेन यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. मात्र रिकेल्टन बाद होताच एमआय केपटाउनचा डाव कोसळला. पुढे कोणतीही मोठी भागीदारी उभी राहू शकली नाही आणि संपूर्ण संघ 14.2 षटकांत केवळ 135 धावांत गारद झाला.
प्रीटोरिया कॅपिटल्सकडून गोलंदाजीतही शेरफेन रदरफोर्ड चमकला. त्याने 3 षटकांत 24 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय केशव महाराजने 4 षटकांत 28 धावा देत 3 विकेट घेतल्या, तर टायमल मिल्स, लिजाड विल्यम्स आणि ब्राइस पार्सन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Comments are closed.