शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेने पाठवले समन्स

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिल्पा आणि राज यांच्यावर ६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. आता शिल्पा आणि राज यांना या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) समन्स बजावले आहेत. सुरुवातीला दोघांनाही १० सप्टेंबर रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु कुंद्रा यांनी १५ सप्टेंबरपर्यंत वेळ मागितला होता.
राज कुंद्रा यांना १५ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहावे लागेल. दरम्यान, शिल्पा आणि राज यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (LOC) देखील जारी करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) च्या लेखापरीक्षकांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
जुहू पोलिस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक दीपक कोठारी (६०) यांच्या तक्रारीवर आधारित होता. कोठारी यांनी आरोप केला आहे की २०१५ ते २०२३ दरम्यान त्यांनी शेट्टी आणि कुंद्रा यांनी प्रमोट केलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत व्यवसाय विस्तारासाठी ६०.४८ कोटी रुपये गुंतवले होते. असा आरोप आहे की, आरोपींनी हे पैसे त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी वापरले आणि आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करत आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावरील आरोपांवर त्यांचे वकील प्रशांत पाटील म्हणतात, त्यांच्या क्लायंटवरील सर्व आरोप खोटे आहेत. एखादी कंपनी दिवाळखोर होते तेव्हा एनसीएलटीमध्ये खटला चालवला जातो. तसेच ज्यांचे पैसे शिल्लक असतात ते एनसीएलटीमध्ये जातात आणि त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी अर्ज करतात, जे तक्रारदाराने कधीही केले नाही. शिल्पाच्या वकिलाच्या मते, तक्रारदार त्या कंपनीत भागीदार होता. तक्रारदाराचा मुलगा त्या कंपनीत संचालक पदावर होता. शिल्पा आणि तक्रारदार यांच्यात एक इक्विटी करार झाला होता, म्हणजेच नफा झाला तरी तो दोघांमध्ये विभागला जाईल आणि तोटा झाला तरी तो दोघांमध्ये विभागला जाईल.
Comments are closed.