मिंधे आमदार महेंद्र दळवींच्या कार्यकर्त्याचा राणे कुटुंबावर हल्ला; एक ठार, तीन गंभीर, पाच आरोपींना बेड्या

सत्ता आणि पैशाच्या जोरावर मिंध्यांच्या बगलबच्च्यांनी ठिकठिकाणी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. असाच एक खूनखराब्याचा प्रकार अलिबागच्या आवासमध्ये घडला आहे. जुन्या वादातून आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी आवास गावातील राणे कुटुंबावर चाल करत राडा केला. तलवारी, चाकू, सुऱ्यांनी निर्दयीपणे वार केले. यामध्ये धर्मेंद्र राणे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या घरातील अन्य तीनजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील आवास गावात हा राडा झाला आहे. काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून राणे आणि म्हात्रे कुटुंबात वाद झाला होता. गुरुवारी रात्री धर्मेंद्र राणे व त्यांचे भाऊ अवकाळी पावसात भिजत असलेली गाडी आपल्या शेडमध्ये उभी करत होते. त्याचवेळी आमदार महेंद्र दळवी यांचा समर्थक वैभव म्हात्रे, मूख्य सूत्रधार देवेंद्र म्हात्रे, अंकित राणे, शुभम पाटील, देवेंद्रची पत्नी पूनम म्हात्रे, मुलगी सिया हे सहाजण नंग्या तलवारी, चाकू, सुरे नाचवत येऊन राणे कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला. वैभव म्हात्रे याने धर्मेंद्र राणे यांना पकडून ठेवले. तर मूख्य सूत्रधार देवेंद्र म्हात्रे याने हातातील चाकू धर्मेंद्र यांच्या छातीत खुपसला. हा घाव वर्मी लागल्याने धर्मेंद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
धरा.. एकालाही जिवंत सोडू नका !
हल्लेखोर मिळेल त्याच्यावर सपासप वार करत होते. धरा, एकालाही जिवंत सोडू नका, असे बोलत अर्वाच्च शिवीगाळ करत होते. धर्मेंद्र यांना ठार मारल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा भाऊ विश्वास व विवेक यांच्यावरही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले धर्मेंद्र यांना पाहून त्यांची आई करुणा राणे धायमोकलून रडत मुलांच्या मदतीला धावून आल्या. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्याही मानेवर, हातावर तलवारीचे वार केले. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी आवास गावात धाव घेत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. सर्व जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही दहशत नेमकी कोणाच्या जीवावर?
हल्लेखोरांमधील वैभव म्हात्रे हा आमदार महेंद्र दळवी यांचा समर्थक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अगदी हात धरून वैभव म्हात्रे याला दळवी यांनी उभे केल्याचे एका छायाचित्रात दिसत आहे. त्यांच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये वैभव म्हात्रे असतो. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आमदार दळवी यांचा अंगरक्षक तसेच एका कामगाराला पोयनाड येथील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वीच वाहनचालकाविरोधातही विनयभंगाची तक्रार एका महिलेने केली होती. त्यामुळे ही सर्व दहशत नेमकी कोणाच्या जीवावर सुरू आहे, असा प्रश्न अलिबागकरांनी केला आहे.
Comments are closed.