डबलच्या आमिषाला बळी पडले,शिर्डीत 21 जणांचे दीड कोटी लुटले; ग्रो-मोअरच्या बाप-लेकावर गुन्हा
अहिलीनगर: दुप्पट पैसे किंवा जादा परताव्याचे आमिष दाखवून सातत्याने सर्वसामान्य, व नोकरदार वर्गाची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता, साईबाबांच्या शिर्डीत एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून “ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी”ने शिर्डीतील (Shirdi) 21 जणांची 1 कोटी 65 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या कंपनीने विविध जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची शंका असून याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला नंदुरबार पोलिसांनी (Police) शहादा येथे अटक केली आहे. आरोपी सावळे पाटील याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाले आहेत.
शिर्डीतील अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिर्डी आणि परिसरातील 21 गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 21 गुंतवणूकदारांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घोटाळ्यात आज अनेकांनी पुढे येत गुन्हा दाखल केला असून आज जरी रक्कम कमी असली तरी आरोपीवर धुळे, नंदुरबार, मनमाड, धुळे यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, फसवणुकीबाबतचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी अटक असून इतर सहा जण अद्यापही फरार आहेत.
फसवणूक झालेल्यांनी पुढे यावं
या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी, काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते. मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. “गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल” असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले आणि याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली. मात्र, आता त्याचे पितळ उघडे पडले आहे. आता, आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर गुंतवणूकदारांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे. भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी केले आहे.
हेही वाचा
निशिकांत दुबे, आशिष शेलारांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपवर जोरदार हल्ला
आणखी वाचा
Comments are closed.