शिर्डीचे साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता वाढलेली असतानाच आता शिर्डी येथील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीची दखल घेत शिर्डीमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
धमकीचा ई-मेल पाठविणाऱया अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये सावुक्कू शंकर आणि जमिश मुबीन यांच्या फाशीच्या निषेधार्थ हल्ल्याची योजना असून यासाठी ईएफपी प्रकारातील स्फोटके वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, सुरक्षेसाठी मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
अहिल्यानगर व शिर्डीच्या बॉम्बशोध पथकाने मंदिर व परिसराची कसून तपासणी केली आहे. मात्र, संशयास्पद काहीही आढळले नाही.
साईभक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावे, असे आवाहन साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
Comments are closed.