पराभवाचा वचपा पालिका निवडणुकीत काढणार ! उरणमधील शिवसैनिकांचा निर्धार
विधानसभेत झालेला पराभव हा ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे झाला. मात्र शिवसैनिकांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेतील पराभवाचा वचपा आगामी नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काढला जाणार असून कितीही अडचणी आल्या तरी ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या नवीन शेवा शाखेचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यानिमित्त मालती भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीचे हळदीकुंकूदेखील आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना मनोहर भोईर यांनी सांगितले की, ज्येष्ठ दिवंगत अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या उपस्थितीत 31 जानेवारी 1988 रोजी या शाखेची स्थापना झाली. अनेक आंदोलने तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. आता वेळ आली आहे ती गद्दारांना धडा शिकवण्याची. कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून पालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका जिंकू, असे भोईर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
या वेळी नवनिर्वाचित उपसरपंच भूपेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उरण तालुका संघटक बी. एन. डाकी, तालुका संपर्कप्रमुख दीपक भोईर, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक अमित भगत, द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, विभागप्रमुख एस. के. पुरो, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली घरत, महिला आघाडीच्या तालुका संपर्क संघटक प्रणिता म्हात्रे, विधानसभा संघटक ज्योती म्हात्रे, उपतालुका संघटक सुजाता पाटील, उरण शहर संघटक मेघा मेस्त्री, कविता गाडे, सरिता पाटील आदी उपस्थित होते.
Comments are closed.