पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, शिवसेनेची मागणी
चिपळूण शहर व तालुक्याच्या दृष्टीने पावसाळा हा केवळ ऋतू नसून आपत्कालीन व्यवस्थापनासाठी मोठी कसोटीच असते. दरवर्षी अतिवृष्टी, पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, रस्त्यांची दुरवस्था, शेतीविषयक अडचणी आणि प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी यांचा फटका सामान्य नागरिकांना बसत असतो. यंदाही पावसाळा तोंडावर आला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या वतीने नागरिकांच्या भावना व सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
चिपळूण शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली आपत्कालीन व्यवस्थापन बैठक अद्याप झालेली नसल्याचे दिसून येत आहे. संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक तातडीने घेण्यात यावी व त्यातील निर्णय नागरिकांसमोर जाहीर करण्यात यावेत. NDRF किंवा इतर आपत्ती व्यवस्थापन पथके नेमकी कधी आणि कुठे दाखल होणार आहेत, त्यांची संख्या किती असेल आणि कोणत्या भागांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याची स्पष्ट माहिती प्रशासनाने द्यावी.
चिपळूण नगरपरिषदेने शहरातील सर्व प्रमुख नाले, गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्थेची साफसफाई कितपत पूर्ण केली आहे याचा अहवाल सार्वजनिक करावा. विशेषतः मागील काही वर्षांत पाणी साचलेल्या आणि पूरग्रस्त ठरलेल्या भागांबाबत कोणती विशेष उपाययोजना करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यात यावे. महावितरण विभागाने चिपळूण शहर व तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेली पूर्वतयारी जाहीर करावी. धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, उपकेंद्रांची सुरक्षा, पर्यायी यंत्रणा आणि आपत्कालीन दुरुस्ती पथकांची उपलब्धता याबाबत माहिती नागरिकांना देण्यात यावी.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेतील काम अद्याप सुरू आहे. चुकीची रचना, खोदलेले रस्ते, अपूर्ण जलनिस्सारण व्यवस्था आणि अपुरी सूचना फलक यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने कोणत्या ठिकाणी कोणती खबरदारी घेतली आहे, याची माहिती तातडीने जाहीर करावी.
शेतकरी वर्गासमोर सध्या युरिया खत, बियाणे आणि कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कृषी विभागाने तालुक्यातील उपलब्ध साठा, पुरवठा नियोजन आणि शेतकऱ्यांसाठीची उपाययोजना स्पष्ट करावी. भू-राजकीय संघर्षामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे डिझेल व इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक इंधन उपलब्ध राहण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे, याबाबत संबंधित विभागाने भूमिका स्पष्ट करावी.याशिवाय खालील मुद्द्यांवरही प्रशासनाने तातडीने माहिती जाहीर करावी.
• संभाव्य पूरग्रस्त गावांची आणि शहरातील संवेदनशील भागांची अद्ययावत यादी.
• स्थलांतर केंद्रे, निवारा केंद्रे आणि त्याठिकाणी उपलब्ध सुविधा.
• शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची आपत्कालीन तयारी.
• पुरेसा औषधसाठा, सर्पदंशावरील औषधे व आरोग्य पथकांची उपलब्धता.
• शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांच्या सुरक्षिततेची तपासणी.
• नदी व धरणांच्या पाणीपातळीचे नियमित अद्ययावत अहवाल.
• दरडप्रवण भागांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना.
• मोबाईल नेटवर्क व दूरसंचार सेवा सुरळीत ठेवण्यासाठीची तयारी.
• बचाव नौका, लाइफ जॅकेट्स व अन्य बचाव साहित्याची उपलब्धता.
• पूरस्थितीत नागरिकांशी संपर्कासाठी नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक.
• शहरातील अवैध बांधकामे व अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या पूरधोक्याबाबतची कारवाई.
• सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्याची स्थिती.
चिपळूणने २००५, २०२१ आणि त्यानंतरच्या नैसर्गिक संकटांचे गंभीर अनुभव घेतले आहेत. त्यामुळे यंदा कागदी नियोजन नको तर प्रत्यक्ष अंमलबजावणी, पारदर्शक माहिती आणि जबाबदार प्रशासन अपेक्षित आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या वतीने प्रशासनाला आवाहन करण्यात येते की, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वरील सर्व मुद्द्यांबाबत तातडीने माहिती जाहीर करावी आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास जनतेला द्यावा.
Comments are closed.