रत्नागिरी स्थानकाचे इंग्रजी नाव आठ दिवसांत बदला, अन्यथा काळे फासू! शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा इशारा

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकातील प्रवेशद्वार तसेच बहिर्गमन द्वारावर इंग्रजीत नामफलक उभारल्याचे निदर्शनास आले आहे. हा इंग्रजाळलेपणा आठ दिवसांत दूर करून त्याचे मराठीकरण करावे  अन्यथा मी स्वतः येऊन या इंग्रजी फलकास काळे फासेन असा इशारा शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्टेशनवरील स्वागताचे, स्टेशनमध्ये प्रवेश आणि बहिर्गमन करणाऱ्या  सर्व द्वारांवर इंग्रजी भाषेत नामफलक लिहिलेले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्हीच मिळवून दिला असा ढोल बजावणाऱ्या बडव्यांना आपल्याच राज्यात मराठी भाषेचा अवमान होत आहे याचे काहीच वाटत नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचे सावंत म्हणाले.

राज्य सरकारचे एक मंत्री तर रत्नागिरीतूनच निवडून आले आहेत.कोकण रेल्वे दुपदरी करा, गाडय़ा वाढवा अशा काही मागण्या केल्या तर रेल्वेमंत्री दुर्गम भाग आहे, खर्चिक बाब असल्याची पळवाट काढत राहतात. कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर आजही अधिभार लावला जात आहे. स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. कणकवली स्टेशन परिसर असाच सुशोभित केला आहे. पण स्टेशनवर छप्पर नाही. त्यामुळे प्रवाशांना स्वतःच्या सामानासोबत  छत्र्या घेऊन उभे रहावे लागत आहे. हीच बाब रत्नागिरीत आणि कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांंवर असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.