लोकलची गर्दी कमी करण्यासाठी एलिव्हेटेड रेल्वे सुरू करा! शिवसेनेची लोकसभेत आग्रही मागणी
‘‘मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी कमी करून त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी एलिव्हेटेड ट्रेन हा उत्तम पर्याय आहे. सरकारने या प्रकल्पावर गांभीर्याने विचार करावा,’’ अशी मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केली.
रेल्वे मंत्रालयाच्या 2026-27च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. सरकार बुलेट ट्रेन आणि हायस्पीड कॉरिडॉरच्या गप्पा मारते, मात्र सामान्य प्रवाशांच्या पदरात काय पडते, असा प्रश्न करताना त्यांनी मुंबईतील रेल्वे सेवेचा दाखला दिला. ‘‘मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही मुंबईकरांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. त्या सुविधा देण्यासाठी मार्गिका वाहाच उपाय आहे. जोपर्यंत 4 मार्गिकांचे 6 मार्गिकांमध्ये रुपांतर होत नाही, तोपर्यंत लोकल सेवेचा बोजवारा उडालेलाच राहील. यावर तोडगा कायचा असेल तर सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी सुचवलेल्या ‘एलिव्हेटेड ट्रेन’ प्रकल्पावर विचार होण्याची गरज आहे,’’ असे सावंत म्हणाले.
शिवरायांच्या पुतळ्यास नकार का?
केवडिया स्टेशनवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवला जाऊ शकतो, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर महाराजांचा पुतळा बसवण्यास प्रशासनचा नकार का, असा सवाल त्यांनी केला. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यास काय अडचण आहे, अशी विचारणाही सावंत यांनी केली.
शिवसेनेच्या मागण्या
मोटरमन, गँगमन व खलाशी यांच्या समस्यांकडे लक्ष द्या.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करा व संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करा.
बुलेट ट्रेनच्या कामामुळे पालघरच्या सफाळे येथील शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळवून द्या.
इंदूर-मनमाड रेल्वेसाठी जमीन देणाऱया शेतकऱयांना योग्य मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना नोकरी द्या.
सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदला.
Comments are closed.