कल्याण ग्रामीणमधील मतदार याद्यांमध्ये घोळ, दुबार नावे वगळण्याची शिवसेनेची मागणी

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. अनेकांची दुबार नावे आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. मतदार यादीची छाननी करून दुबार नावे वगळावीत या मागणीचे निवेदनही दिले.
जिल्हा संघटक तात्या माने यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण विधानसभाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, उपशहरप्रमुख मारुती पडलकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार याद्यांतील घोळाची माहिती दिली. निवडणूक मतदार याद्या अचूक आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे. मात्र दिवा शहरासह संपूर्ण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मतदार याद्यांमध्ये असंख्य मतदारांची नावे दोनवेळा किंवा त्याहून अधिक वेळा समाविष्ट झाली आहेत. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असून निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येत आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी सर्व दुबार नावे तत्काळ वगळून मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी गुजर यांच्याकडे शिवसेना शिष्टमंडळाने केली.
Comments are closed.