शिवसेनेने सत्तेसाठी राजकारण केले नाही! सरहद पुणेच्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे दिमाखदार उद्घाटन

सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरहद संस्थेमध्ये शिकणाऱया मणिपूरच्या विद्यार्थिनींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. या सत्काराने आपण भारावून गेल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. या सोहळय़ाप्रसंगी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सरहदचे संस्थापक संजय नहार, संतसिंग मोखा, वसंत मोरे, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया उपस्थित होते.
सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो आहोत. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काका श्रीकांत ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘माझे काका श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने स्टुडिओ साकारला याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांची ही दोन मुले बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी ‘मार्मिक’च्या माध्यमातून सर्व मदत केली होती. असे काका आणि वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिकामध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेबांनीसुद्धा सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. वेळ आली तेव्हा सत्तेवर लाथ मारली. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे,’ असे ते म्हणाले.
Comments are closed.