वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तपोवनात वणवा पेटला,शिवसेनेचे ठिय्या आंदोलन; कवींचे संमेलन, कलाकाराचे सतारवादन

कुंभमेळ्यानिमित्त साधुग्रामच्या नावाखाली एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी तपोवनातील अठराशे वृक्ष तोडण्याचा कट सरकारने रचला आहे. त्याविरुद्ध कवी, साहित्यिकांसह कलाकार सरसावले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात तपोवनात अक्षरशः वणवा पेटला आहे. आज शिवसेनेने वृक्षांखाली ठिय्या करून सरकारचा निषेध केला. कवींनी संमेलनात कविता सादर करून संताप व्यक्त केला, तर कलाकाराने सतारवादन करून भावना मांडल्या.

कुंभमेळ्यानिमित्त तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी अठराशेहून अधिक दुर्मिळ वृक्षांची कत्तल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्यक्षात कुंभमेळा हे निमित्त असून तेथे एक्झिबिशन सेंटर उभारणीचा घाट सरकारकडून घातला जात असल्याचे चव्हाटय़ावर आले आहे. प्रभू श्रीरामांनी वास्तव्य केलेला हा परिसर विविध वृक्षांनी नटलेला आहे. पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच आध्यात्मिक महत्त्व अबाधित राहावे, यासाठी सर्वस्तरातून वृक्षतोडीला विरोध होत आहे. रविवारी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱयांनी सकाळी तपोवन गाठले, तेथील वृक्षांची पाहणी केली, वटवृक्षाखाली ठिय्या आंदोलन केले. वृक्षतोडीच्या निर्णयाला जोरदार विरोध करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध केला. राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी महापौर वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी महानगरप्रमुख प्रथमेश गीते, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, दिलीप मोरे, महेश बडवे, राहुल दराडे, बाळासाहेब कोकणे, राहुल ताजनपुरे, वैभव ठाकरे, ऋतुराज पांडे, शैलेश सूर्यवंशी, योगेश गाडेकर, सुनील जाधव, राजेंद्र क्षीरसागर, साहेबराव जाधव, मसूद जिलानी, सुभाष शेजवळ, संदेश फुले, सुनील निरगुडे, ऋषी वर्मा, शिवानी पांडे, शोभा दिवे, फैमिदा रंगरेज, सीमा बडदे, कीर्ती निरगुडे, शोभा वाल्डे, सुवर्णा काळुंगे, शारदा सपकाळ, सिंधू पगार, सिंधू वाघ, शोभा दळवी, मोहिनी राव, किमया बागुल, प्रियंका खोडे, वैशाली पवार, ज्योती कुमावत, बबिता मोरे आदी हजर होते.

सतार वाजवून पाठिंबा

तपोवनातील वृक्षतोड निर्णयाच्या विरोधातील लढय़ाला ज्येष्ठ सतारवादकाने सतारवादन करून पाठिंबा दिला. तपोवनातील वटवृक्षाखाली बसून त्यांनी आपली कला सादर केली. वृक्ष वाचविण्यासाठी सरकारला साद घातली.

Comments are closed.