इंदापूर-वाढवण रस्त्याच्या चिंधड्या; प्रशासनाला बळी हवेत का? शिवसेनेने घातले सरकारचे श्राद्ध, पितृपंधरवड्यात आंदोलन

इंदापूर-वाढवण रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झालेली असल्याने या रस्त्यावरील प्रवास वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत असली तरी तिच्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवसेनेने पितृपंधरवड्यात आज सरकारचे श्राद्ध घातले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी सरकार मेलं हो मेलं, अशी प्रतीकात्मक ‘बोंब’ मारत प्रशासनाला बळी हवेत का, असा सवाल केला.

इंदापूर-पाचाड-करंजाडी-विसापूर-दापोली राज्य महामार्ग क्रमांक ९७ वर इंदापूर ते वाढवणदरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालक, ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. इंदापूर, भाले, भिनाड, पानसई, वाढवण आणि परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने आक्रमक होत आज शिवसेनेने रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर सरकारचे श्राद्ध घातले.

एसएमसी इन्फ्रा कंपनीमार्फत या मार्गाचे काम करण्यात आले होते. त्यावेळी पानसई ते पाचाड मार्ग वाहतुकीस योग्य आणि मजबूत झाल्याचा दावा शासनाने केला होता. मात्र नंतर इंदापूर ते वाढवण दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे कामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या रस्त्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे शेतकरीही शिवसेनेच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मोबदला तातडीने द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रसंगी दक्षिण रायगड उपजिल्हाप्रमुख बंटी पोटफोडे, महाड विधानसभा क्षेत्रप्रमुख जनार्दन मानकर, माणगाव तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे, प्रवक्ते लहूजी लुष्टे आदी उपस्थित होते.

रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा

या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा. या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन झालेले आहे त्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य मोबदला देऊन हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी शिवसेना रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी यावेळी केली.

Comments are closed.