Shiv sena shinde faction minister uday samant and sanjay shirsat meet santosh deshmukh family at beed urk
बीड – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज शिवसेना शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांनी भेट घेतली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसात विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून होत आहे. दरम्यान आज शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन आलो असल्याचं उदय सामंत म्हणाले.
संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना छळ-छळ करुन मारण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील काही आरोपींना अजुनही अटक झालेली नाही. त्यांच्या अटकेची कारवाई तातडीने केली जाईल. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
– Advertisement –
आरोपी कोणीही असला तरी सोडणार नाही
मंत्री उदय सामंत म्हणाले की, आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही, हा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन मी आलो आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख कुटुंबियांसाठी मदत पाठवली आहे, ती देण्यासाठी आलो आहे. देशमुख कुटुंबाला स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते शिवसेना शिंदे गट करण्यास तयार असल्याचे उदय सामंत म्हणाले.
बीडमधील दहशत संपली पाहिजे…
मंत्री संजय शिरसाट यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. बीड मधील दहशत संपवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. पोलीस अधीक्षक दोन दिवसांपूर्वीच नियुक्त झाले आहेत. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, ते आरोपींना जेरबंद करतील असा विश्वास मंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला. सरपंच देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. न्यायलयीन चौकशी देखील होणार आहे, या हत्येतील दोषींना सोडलं जाणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
– Advertisement –
Edited by – Unmesh Khandale
Comments are closed.