पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज शिवसेनेचा हंबरडा मोर्चा! हेक्टरी 50 हजार द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा!

अस्मानी-सुलतानी संकटाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्या शनिवारी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्तालयावर शिवसेना ‘हंबरडा मोर्चा’ काढून धडक देणार आहे. सकाळी 11 वाजता क्रांतीचौकातून निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार असून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरशः तांडव घातले. संततधार पावसामुळे घरदार, शेतशिवार सगळे काही वाहून गेले. नदीकाठाने बहरलेली शेती खरवडून गेली. सोयाबीन, मका, बाजरी, उडीद, कापूस शेतातच सडला. मोसंबी, केळी, डाळिंब, आंबा, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. संकटाच्या या काळात राज्य सरकार मदतीचा हात देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु पॅकेजची धूळफेक करून राज्य सरकारने हात वर केले. दसरा गेला, दिवाळी आली… पण मदतीच्या नावाखाली शेतकऱ्याला खडकूही मिळाला नाही.
अतिवृष्टीमुळे उघड्यावर आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना उभी राहिली आहे. उद्या शनिवारी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला प्रारंभ होणार आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतून हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाचा समारोप गुलमंडीवर होणार असून या मोर्चात शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, आमदार कैलास पाटील, राहुल पाटील आणि प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या आहेत मागण्या
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा.
- हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या.
- पीक विम्याचे निकष पूर्ववत ठेवा.
- घरे आणि पशुधनासाठी निकष शिथिल करून मदत द्या.
Comments are closed.