तोच जोश… तोच उत्साह… षण्मुखानंद सभागृहात निष्ठावंतांचा महासागर

‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है…’ अशा शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी आज संपूर्ण शीव परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते ते शिवसेनेच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्याचे. दुपारपासूनच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन आणि भगवी उपरणी घालून या मेळाव्यात सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. कितीही गद्दारी झाली तरी आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. जिथे ठाकरे तिथे निष्ठा…जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक असे जणू वचनच या जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी दिले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन असा दुहेरी योग जुळून आल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये या मेळाव्याविषयी प्रचंड उत्सुकता होती.

सहा खासदारांनी गद्दारी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या गद्दारांचा कशाप्रकारे समाचार घेणार तसेच शिवसैनिकांना कोणता आदेश देणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती.

षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावले होते. दुपारपासूनच मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सभागृहात दाखल होत होते.

‘शिवसेना शिवसेना’ गाण्याने वाढवला उत्साह

शिवसैनिकांना स्फूर्ती देणाऱया ‘शिवसेना शिवसेना, पक्ष आपला ठाकरे… शिवसेना मनामनात, शिवसेना नसानसात’ या गाण्याची धून सभागृहात वाजताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

गद्दारांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

पैशांच्या लोभापायी गद्दार खासदारांनी शिवसेनेच्या आणि सर्वसामान्य मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. असे कितीही गद्दार आले गेले तरी आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांना काही फरक पडत नाही. निष्ठावंत शिवसैनिक आजही शिवसेनेच्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी बोलून दाखवला. यावेळी शिवसैनिकांनी ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है…’, ‘या गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा दिल्या.

आमचं मत आम्हाला परत द्या!

शिवसेनेच्या मशाल चिन्हावर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱयावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे ‘गद्दारांनो, आमचं मत आम्हाला परत द्या!’ असा संताप व्यक्त करणारे फलक शिवसैनिकांनी झळकावले. ‘उद्धव ठाकरे यांनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या दगडाची लायकी नसताना शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारे आम्ही त्यांना निवडून दिले. तो दगड स्वतःची दमडी आणि चामडी वाचवण्यासाठी दुसऱया पक्षात जात असेल तर तो गद्दारच!’ त्या दगडाच्या चेहऱयाकडे बघून आम्ही मतदान करीत नाही. म्हणून आमचं मत आम्हाला परत द्या!’ असा संताप फलकाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. ‘देव माणूस, उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दारच’ असा संतापही व्यक्त झाला.

Comments are closed.