मतचोरीनंतर आता बी फॉर्मची चोरी! शिवसेनेने नोंदवला आक्षेप

अहिल्यानगर जिह्यातील राहता नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जात आहे, परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे चार बी फॉर्म चोरून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यांनी बी फॉर्म भरले त्यांची हकालपट्टीही करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व अधिकाऱयांना लेखी कळवूनही त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. आता मतचोरीनंतर बी फॉर्म चोरी करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

राहाता नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. निवडणूक प्रक्रियेमधील विसंगती, परिपत्रकातील अचानक बदल आणि फसवणुकीच्या चार उमेदवारी अर्जांबाबत अनिल देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाचे बी फॉर्म चोरणे हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. एवढे करूनही निवडणूक अधिकाऱयांनी कोणतीही दखल न घेता ज्यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केले ते वैध ठरवले गेले. आता मतचोरीबरोबरच आमच्या पक्षासोबत बी फॉर्म चोरीचा खेळ खेळला जात आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांना काळीमा फासणारा प्रकार आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.

परिपत्रकाला शिवसेनेची हरकत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यासाठी विविध आघाडय़ा, राजकीय पक्ष आणि अपक्षांनी अर्ज भरले. त्यासोबत पक्षाचा बी फॉर्म दिला जातो. त्या बी फॉर्ममध्ये पक्षाच्या उमेदवारीची माहिती असते. या फॉर्ममध्ये पाच, सहा व सात कॉलममध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत त्या पक्षाच्या डमी उमेदवाराची माहिती भरली जाते. डमी उमेदवारासाठी एक सूचक लागतो. हे परिपत्रक आहे. मुख्य उमेदवाराला काही अडचण आली तर डमी उमेदवार अर्ज भरतो. 17 तारखेला निवडणूक पूर्ण झाली. 18 तारखेला अर्जाची दुपारपर्यंत छाननी झाली. डमी उमेदवाराला सूचक आहे का, याची पडताळणी झाली. यात अधिकृत राजकीय पक्षांच्या डमी उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले, पण त्याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाचे नवीन परिपत्रक जारी झाले. त्यामध्ये डमी उमेदवाराला एका सूचकाऐवजी पाच सूचकांची गरज असल्याचे नमूद केले. पाच सूचक नसतील तर अर्ज बाद होतील असे परिपत्रक जारी झाले. मुदत संपल्यावर असे परिपत्रक काढण्यात आल्याने शिवसेनेने परिपत्रकाला हरकत घेतली आहे.

लेखी कळवूनही अर्ज बाद केले नाहीत

राहता नगर परिषदेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत असताना शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने चार अर्ज दाखल केले गेले. याची माहिती मिळताच पीठासीन अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकाऱयांना लेखी स्वरूपात कळवून हे अर्ज बाद करण्याची मागणी केली. हे अर्ज छाननीमध्ये बाद करणे अपेक्षित होते, असे देसाई म्हणाले.

छाननीनंतर परिपत्रक… डमी उमेदवारासाठी पाच सूचक हवेत!

उमेदवारी अर्जाच्या छाननी दिवशी ऐनवेळी डमी उमेदवारासाठी एकच्या ऐवजी पाच सूचक हवेत असे परिपत्रक काढून तुमच्याच नियमात तुम्ही बदल करीत आहात. याचे उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 26 तारखेपर्यंत निवडणूक चिन्ह मिळणार आहे. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यामध्ये हस्तक्षेप करणे अवाजवी आहे. याबाबत आम्ही राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली, पण दाद दिली नाही, असे अनिल देसाई म्हणाले.

Comments are closed.