शिवतीर्थावर घुमणार ठाकरेंचा आवाssज! उद्या शिवसेनेचा अभूतपूर्व दसरा मेळावा
सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात आणि अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवरून राज्यकर्त्यांवर कसा आसुड ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून शिवसैनिक या मेळाव्याला येणार आहेत. हा मेळावा अभूतपूर्व असाच ठरणार आहे.
दसरा मेळाव्यातून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या तेजस्वी विचारांतून समाजमन जागृत झाले. बाळासाहेबांच्या विचारांनी राजकीय दिशा बदलून टाकली. आजही ते राष्ट्रहिताचे, महाराष्ट्र हिताचे विचार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल अविरतपणे सुरू आहे.
राज्य आणि देशातील राजकीय स्थिती, अतिवृष्टीने बेहाल झालेला शेतकरी, सरकारकडून मदत देण्यास होणारा विलंब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार, शिवसैनिकांना कोणता संदेश देणार, महाराष्ट्र हितासाठी कोणती गर्जना करणार, याकडे लक्ष लागले आहे.
विचार ठाकरेंचा… आवाज महाराष्ट्राचा
दसरा मेळाव्याचा पहिला टिझर शिवसेनेने काही दिवसांपूर्वी लॉन्च केला होता. ‘परंपरा विचारांची… धगधगत्या मशालीची! महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची!!’ असे अभिवचन त्यात देण्यात आले होते. आज दुसरा टिझर लाँच करण्यात आला. ‘शिवसैनिकांना ऊर्जा देणारा, महाराष्ट्राचं आत्मभान जागवणारा, उत्कर्षाची दिशा ठरवणारा, हिंदुत्वाचा हुंकार भरणारा’ असा दसरा मेळाव्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
दसरा मेळाव्याची जय्यत तयारी शिवतीर्थावर सुरू आहे. मेळाव्याकरिता भव्यदिव्य व आकर्षक व्यासपीठ उभारण्यात येत आहे. मेळाव्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱयातून येणाऱया असंख्य शिवसैनिकांच्या व्यवस्थेकरिता आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
शस्त्रपूजा, सोने वाटप आणि रावण दहन
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेनुसार शिवतीर्थावर सोने वाटप, शस्त्रपूजा त्याचबरोबर रावण दहनही होणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार तसेच सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
Comments are closed.