शिवसेनेच्या रणरागिणींचे राज्यव्यापी आंदोलन, घराघरातून मोदींना पाठवणार सिंदूर! पहलगामच्या वेदनेचा विसर… हिंदुस्थान आज पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे अश्रू सुकले नसतानाच मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला आहे. अबुधाबीमध्ये उद्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे देशभरात जनभावना तीव्र आहे. या जनभावनेला शिवसेना रस्त्यावर उतरून वाचा पह्डणार आहे. आजच्या सामन्याविरोधात शिवसेनेच्या रणरागिणी ‘माझं कुंकू माझा देश’ हे राज्यव्यापी आंदोलन करणार असून महाराष्ट्राच्या घराघरातून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभांमधून मोठमोठय़ा भावनिक घोषणा केल्या होत्या. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे मोदी म्हणाले होते. पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याची घोषणाही केली, मात्र काही दिवसांतच नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला याचा विसर पडला. देशवासीयांच्या भावनांचा विचार न करता आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली. मोदींना त्यांच्या आश्वासनांची व सिंदूरची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
महिला आघाडी सज्ज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. त्यानुसार सकाळी 11 वाजता राज्यातील चौकाचौकांत शिवसेनेच्या महिला रस्त्यावर उतरणार आहेत. मोदी सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार आहेत. त्याच वेळी घराघरांतून कुंकू जमा केले जाणार असून ते एकत्र करून पोस्टामार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठवले जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेनेची महिला आघाडी सज्ज झाली आहे. शाखाशाखांतून आंदोलनाची जय्यत तयारी झाली आहे. शिवसेनेच्या या आंदोलनात मोठय़ा संख्येने देशभक्त महिला सहभागी होणार आहेत.
मोदींवर ट्रम्पचा दबाव नाही ना?
पंतप्रधान मोदींना पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची काय गरज आहे? संपूर्ण देश म्हणतोय की, ही मॅच नको, तरीही ही मॅच का खेळवली जातेय? हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात तरी घेतला गेला नाही ना? ट्रम्पसमोर झुकणार तरी किती, असा सवाल ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Comments are closed.