लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा, शिवसेनेचा आरोप

लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या तब्बल 26 लाख इतकी आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्र्यांच्याच मतदारसंघात बोगस लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. या योजनेत तब्बल 5 हजार 136 कोटी 30 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केला. या चर्चेवर सरकारकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला.

सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे लाडकी बहीण योजनेतील घोटाळा सभागृहात मांडला. या योजनेत महिलांच्या नावाने 14 हजार 298 पुरुषांनी लाभ घेतला. अजित पवार यांच्या मतदारसंघात 2 लाख 4 हजार बोगस लाभार्थी आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात 1 लाख 35 हजार 300 बोगस लाभार्थी आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात 1 लाख 25 हजार 756, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात 1 लाख 86 हजार 800, संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात 1 लाख 4 हजार 700, हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात 1 लाख 14 हजार, आशिष शेलार यांच्या मतदारसंघात 1 लाख 13 हजार, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात 95 हजार 500, आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात 63 हजार पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात 71 हजार बोगस लाभार्थी आहेत. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून श्वेतपत्रिक काढण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.

या चर्चेत नाना पटोले, हारुन खान, जयंत पाटील यांनीही भाग घेतला. यावरील चर्चेला उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुरुष व सरकारी कर्मचाऱयांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे मान्य केले. महिलांची बँक खाती नसल्याने त्यांच्या घरातील पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून दोन महिन्यांत पैसे वसूल केले जातील. पुरुष लाभार्थींची त्यात फेरपडताळणी करून खरे लाभार्थी किती, खोटे लाभार्थी किती या संदर्भातील चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, या योजनेत गैरव्यवहार झालेला नाही, योजनेला बदनाम करू नये, असे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिले.

विरोधकांचा सभात्याग

चर्चेला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नाही असा दावा केला. यावर शिवसेनेचे विधानसभेतील गट नेते भास्कर जाधव संतप्त होऊ उभे राहिले. या योजनेत चुका झाल्या आहेत. भ्रष्टाचार, गैरव्यवहार झाला आहे. महाराष्ट्र राज्य लुटण्याचे काम तुम्ही केले. समाधानकारक उत्तर देत नाहीत. म्हणून सरकारचा निषेध करीत आम्ही सभात्याग करीत असल्याचे भास्कर जाधव यांनी जाहीर केले.

Comments are closed.