तुर्थ्यात हलगी कडाडली; रस्ते, पाण्यासाठी मोर्चा, महापालिकेविरोधात शिवसेना रस्त्यावर

नवी मुंबई पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगरसह अन्य भागांची अवस्था दयनिय झाली आहे. रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिनी आदी सुविधा येथील नागरिकांना व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिका प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज हलगी मोर्चा काढण्यात आला. हलगी वाजवा, अधिकारी जागवा अशी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी यावेळी केली. त्यामुळे इंदिरानगरचा सर्व परिसर दणाणून गेला.

नवी मुंबई शहरात 24 तास पाणीपुरवठा होत असला तरी इंदिरानगर आणि परिसरात पाणी पुरवठ्याचे कोणतेही वेळापत्रक नाही. आठवड्यातून दोन-दोन दिवस पाणी येत नाही. वीज पुरवठाही नेहमीच खंडित होतो. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आज याच भागात हलगी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उपशहरप्रमुख सिद्धाराम शिलवंत, उपविभागप्रमुख जितू गायकवाड, अन्वर खान, शाखाप्रमुख जयेश कांबळे, कार्तिक पिल्ले, गोरख बुरकूल, नीलेश घाडगे, महाराजा पिल्ले, सोनू स्वामी, सचिन चिलमे, राहुल वाघमारे आदी उपस्थित होते.

… तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या भागाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या या वस्तीचा अपेक्षित विकास झालेला नाही. या भागातील रस्त्यांची दुरुस्ती, शौचालयांची स्वच्छता आणि नियमित पाणीपुरवठा ही कामे प्रशासनाने 15 दिवसांत मार्गी लावावीत. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांनी दिला आहे.

Comments are closed.