कुणालाही पैसे देण्यापेक्षा, पैसे कमवायला शिकवणं हे फार महत्त्वाचं काम! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने राज्यातील तरुण-तरुणींसाठी निर्यात-आयात (एक्सपोर्ट-इम्पोर्ट) लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रशिक्षण अभ्यासक्रम आजपासून सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील शिवसेना भवनात झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक क्षेत्रातील लॉजिस्टिकचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कुणालाही पैसे देण्यापेक्षा, पैसे कमवायला शिकवणं हे फार महत्त्वाचं काम, असेही ते म्हणाले. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस, दिवाकर रावते, अंबादास दानवे, मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, दरवेळी एक प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न विचारणारेही आपलेच असतात. शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले? वडापाव… पण वडापावची किंमत काय आहे हे बघा. माझ्या मते कुणालाही पैसे देण्यापेक्षा पैसे कमवायला शिकवणे हे फार महत्त्वाचे काम आहे. मराठी माणसाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिवसेनेने शिकवले.

तुला मदत करतो, तू उभा राहा, पण स्वत:चे पाऊल तूच टाकाले पाहिजे. तू जर तुझे पाऊल टाकले तरच तू पुढे जाशील. नाही तर मी तुला खांद्यावर घेऊन गेलो, तर मी जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत तू येशील, पुढचे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जगभरात कुठेही जा, पण महाराष्ट्र आणि देशाचा अभिमान वाटेल असे काम करा. तुमच्यापासून पुढील पिढीने मार्गदर्शन घ्यावे असे काम करा. मेहनतीला मराठी माणूस कुठेही कमी नाही. मराठी माणूस न्यायाचे, हक्काचे मागतोय, उपकाराचे ओझे आम्ही वाहत नाही, ते तुम्हाला दाखवून द्यावे लागेल, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला राजकारणातले लॉजिस्टिक कळते. आमचे आमदार कुठून कुठे गेले, कसे गेले, कोणत्या मार्गाने गेले. उत्पादक बोंबलत बसलाय आणि ग्राहक मजा मारतोय असे आमचे लॉजिस्टिक. लॉजिस्टिक पेक्षा सुरुवातीच्या काळात नोकऱ्या मिळवण्यासाठी शिवसेनेने हॉकीस्टिकचा उपयोग केलेला आहे. म्हणून शिवसेना आजपर्यंत वाटचाल करत आलेली आहे.

शिवसेनाप्रमुखांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून शिवसेनेलाही यावेळी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. शिवसेनेची स्थापना सत्ताप्राप्तीसाठी नाही, तर राज्यात, मुंबईत भूमिपुत्रांना, मराठी माणसांना आपला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी झाली. सुरुवातीच्या काळामध्ये आंदोलनं करावी लागली. आंदोलनांनी बरेच प्रश्न सुटतात, पण पुढे काय? आंदोलनामुळे दारं उघडतील, पण दाराच्या आत जाता येणार नाही. दाराच्या आत जाण्यासाठी तिथे आवश्यक असलेले जे काही कौशल्य पाहिजे ते आपण त्यांना दिले नाही तर बोंबाबोंब करण्याला काही अर्थ नाही. यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली. स्थानीय लोकाधिकारच्या माध्यमातून बँकिंगचे, रेल्वे भरतीचे वर्ग चालवले जातात. आता हे लॉजिस्टिकचे क्षेत्र समोर येत आहे. आता प्रत्येक गोष्टीला लॉजिस्टिक लागते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

असा असेल अभ्यासक्रम…

  • प्रशिक्षण कालावधी सहा आठवडे
  • लॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून धडे
  • अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन
  • थिअरीसह प्रात्यक्षिकाची जोड

Comments are closed.