महिलेला मराठी म्हणत हिणवणाऱ्या बँक अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी कानफटवले, धुळ्यातील प्रकार सोशल मीडियात व्हायरल

शहरातील देवापूर भागातील स्टेट बँकेच्या शाखेत एका महिलेला मराठी असण्यावरुन हिणवणाऱया अधिकाऱयाला आज शिवसैनिकांनी बँकेत जाऊन चांगलाच धडा शिकवला. त्या अमराठी अधिकाऱयाच्या कानशिलात लगावत त्याला अद्दल घडवण्यात आली. दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱयाने ब्रँच लोन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) प्रमोद नगर शाखेचे ब्रँच मॅनेजरने आयटीआयच्या महिला प्राध्यापिकेला ‘तुम्ही मराठी असेच आहात’ असे हिणवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द वापरल्यामुळे आज शिवसैनिकांनी बँकेच्या शाखेत जाऊन जाब विचारला. यावेळी एसबीआय बँकेच्या लोन विभागाच्या अधिकाऱयांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली होती. म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी तेथील लोन ऑफिसर सदाशिव अजगे यांच्या कानशिलात लगावली. यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, शिवसैनिकांकडून यावेळी बँक मॅनेजर अतुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. बँकेतील कर्मचाऱयांनी महिलेची माफी मागितली असून एसबीआय बँक मॅनेजर अतुल गांधी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

बँकेतील कर्मचाऱयांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी

सर्वसामान्य नागरिकांची बँकेतील अधिकारी व कर्मचाऱयांबाबत सातत्याने तक्रार असते. बँकेतील कर्मचारी काम करण्याऐवजी काम टाळण्यातच पटाईत असतात. विनाकारण फिरवाफिरवी केली जाते, अनेकदा कर्जप्रकरणी ‘नाही’ हा शब्द त्यांच्या तोंडी असतो. तर, बँकेतील काही अमराठी अधिकारी जाणीवपूर्वक उद्धटपणे वागतात. ग्राहकांना, शेतकऱयांना सन्मानाने वागणूक देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने करण्यात येत असतात.

Comments are closed.