आज शिवतीर्थावर शिवसेनेचे आंदोलन, वांगचुक यांच्या लढ्याला महाराष्ट्रातून बळ; उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आणि नीट घोटाळाप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्या रविवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जोरदार आंदोलन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होईल. सायंकाळी 4 वाजता सुरू होणाऱया या आंदोलनात मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
भाजप सरकारच्या काळात नीट, सीबीएसईसारख्या अनेक परीक्षांचे पेपर फुटत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. नीट पेपरफुटीनंतर आतापर्यंत तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील सरकार या पेपरफुटीची कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केले आहे. या लढय़ाला बळ देण्यासाठी शिवसेना उद्या शिवतीर्थावर आंदोलन करणार आहे.
सर्वांनी सहभागी व्हा!
मोदी सरकारची हुकूमशाही आणि तरुणांचा आवाज दाबण्याच्या कारस्थानाविरोधात होत असलेल्या आंदोलनात तमाम जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. ‘हा लढा केवळ शिवसेना किंवा एका राजकीय पक्षाचा नसून सर्वांसाठीचा आहे. त्यामुळे या आंदोलनात सगळय़ांनी सहभागी होऊया आणि अवघ्या देशाचा आवाज बनूया’ असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
भगवे वादळ घोंगावणार
आंदोलनाच्या दिवशी उद्या हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तरीदेखील कशाचीही तमा न बाळगता या आंदोलनात हजारो शिवसैनिक हाती भगवे झेंडे घेऊन सहभागी होणार आहेत. त्यामुळे अवघ्या शिवतीर्थावर भगवे वादळ घोंगावणार असून शिवसेनेचा आवाज घुमणार आहे.
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज मैदान
वेळ – सायंकाळी 4 वाजता
Comments are closed.