शिवसेना-मनसे युतीची लवकरच घोषणा
महानगरपालिका निवडणुका एकत्र येऊन लढण्याबाबत शिवसेना आणि मनसेमध्ये मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर युतीसंदर्भात वेगाने हालचाली सुरू झाल्या असून शिवसेना-मनसे युतीची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि आमदार
अॅड. अनिल परब यांनी आज भेट घेऊन चर्चा केली. मनसे नेते बाळा नांदगावकरही यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर अनिल परब यांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा कधी करायची, याबाबत दोन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. तसेच जागावाटपाचा फॉर्म्युला, जागावाटप या सगळय़ा गोष्टींची चर्चा सुरू आहे. चर्चेअंती जो काही निर्णय होईल, तो कळवला जाईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
आम्ही युतीच्या घोषणेची वाट पाहतोय – नांदगावकर
आज आमची बैठक झाली. बैठकीत काही गोष्टी ठरल्या आहेत. पुन्हा आणखी एका बैठकीसाठी बसणार आहोत. कार्यकर्ते, पदाधिकारी युतीच्या घोषणेची वाट पाहतायेत तसे आम्हीही वाट पाहतोय. पुढील एक-दोन दिवसांत नक्कीच तुम्हाला बातमी मिळेल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. काँग्रेसबाबत आमचा कसलाही विषय नाही. सध्याच्या घडीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे एकत्रित येण्याची वाटचाल सुरू आहे, असं नांदगावकर म्हणाले.
महाविकास आघाडी अभेद्य राहावी, अशी आमची इच्छा – अनिल परब
आम्ही आधीच महाविकास आघाडीचा एक भाग आहोत. आमची इच्छा आहे की, महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यात काँग्रेस काय निर्णय घेते, हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याचा अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी अंतिम निर्णय होईल, त्या दिवशी आपल्याला कळवू. काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करायची की नाही, याबाबत आमचे नेते निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे, नाशिक आदी सहा पालिकांत एकत्र लढणार – संजय राऊत
या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महापालिकेमध्ये स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. येत्या आठवडय़ात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई हे मुंबईचीच होती. आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे की, रहमान डपैत कोण आहे? कोणाला मुंबई विकायची आहे? त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत? मुंबईचं कराचीतील ल्यारी शहर कोणी केलेला आहे, हे अख्या मुंबईला माहीत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
काँग्रेस या क्षणी आमच्या सोबत आहे, असे मला दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यांनी आमच्या सोबत मुंबईच्या लढाईत असायला हवे होते, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशीदेखील बोललेले आहे. पण, त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत घेऊ नये, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.