अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उद्या ठाणेकर रस्त्यावर उतरणार; शिवसेना-मनसेच्या मोर्चाची जय्यत तयारी

ठाणे महापालिकेत सुरू असलेली अधिकाऱ्यांची लाचखोरी, कामाच्या नावाखाली ठेकेदारांवर होणारी करोडोंची उधळपट्टी, ठाणेकरांच्या पैशांची होणारी बेसुमार लूट, वाहतूककोंडीत तासन्तास होणारी लटकंती, गुन्हेगारांची सुरू असलेली बेबंदशाही, त्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे पाठबळ यामुळे पिचलेल्या ठाणेकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात शिवसेना आणि मनसेचा संयुक्त महामोर्चा निघणार आहे. सायंकाळी ४ वाजता गडकरी रंगायतन येथून निघणाऱ्या मोर्चात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी केले आहे.

घोडबंदर रोड ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत रोजच्या ट्रॅफिककोंडीत तासन्तास अडकून ठाणेकर घुसमटून गेला आहे. पाणीपट्टी इमानेइतबारे भरणाऱ्या ठाणेकरांचे पाणी बिल्डरांसाठी पळवले जात आहे. भ्रष्टाचारात महाराष्ट्र सातत्याने तीन वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आणि लूट ठाण्यात सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत ठाणे महापालिकेचे ऑडिटच झालेले नाही. त्यामुळे ३६७ कोटींचा हिशेबच सादर करण्यात आलेला नाही. हे पैसे ठाणेकरांच्या कष्टाचे आणि रक्त आटवून कराच्या रूपाने पालिकेला दिलेले आहेत.

दुसरीकडे ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांची लाचखोरी जोरात सुरू आहे. महापालिका स्थापनेच्या दिवशीच २५ लाखांची लाच घेताना मोठा अधिकारी जेरबंद झाला आहे. दीडशे अधिकाऱ्यांची आजही चौकशी सुरू आहे. त्यांना सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे काय, अशी खुले आम चर्चा ठाणेकर करीत आहेत. त्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठीच शिवसेना आणि मनसे एकीची वज्रमूठ वळवून हा मोर्चा काढणार असल्याची माहिती राजन विचारे यांनी दिली. या मोर्चाची पूर्वतयारी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचेही ते म्हणाले.

ठाणेकरांनो.. हा तुमचा आवाज आहे

सोमवारी दुपारी ४ वाजता गडकरी रंगायतन येथून निघणारा हा मोर्चा ठाणे महापालिकेवर धडकणार आहे. हा मोर्चा सर्वसामान्य नागरिक, रिक्षाचालक, घोडबंदरवासी, शाळेतील मुले, पालक, ज्येष्ठ नागरिकांचा आवाज आहे. ठाणेकरांनो.. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राजन विचारे यांनी केले आहे. या मोर्चाचे नियोजन शिवसैनिक व मनसैनिक करीत असून त्याला ठाणेकरांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही विचारे यांनी सांगितले.

Comments are closed.