‘एल्फिन्स्टन’च्या बसेस करी रोड पुलावरून चालवा, शिवसेनेची आग्रही मागणी

अनेक वर्षांपासून एल्फिन्स्टन पुलावरून धावणाऱया बेस्ट बसेस करी रोड पुलावरून चालवाव्यात, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. सध्या बेस्टच्या मार्ग क्र. 201 आणि 162 या दोन्ही बसेस चिंचपोकळी पुलावरून चालवल्या जात आहेत. त्यामुळे परळ, शिवडी, वरळी परिसरातील रहिवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने बेस्ट बसेसचे नियोजन करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी बेस्ट प्रशासन, एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
एल्फिन्स्टन पुलाचे सध्या तोडकाम सुरू आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने बेस्ट बसेसच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे बस आगार ते सांताक्रुझ असा मार्ग असलेली बस क्र. 201 ही बेस्टची बस सांताक्रुझ ते परळ एसटी आगारापर्यंत चालविली जात आहे. त्यामुळे परळ, शिवडी परिसरातील विद्यार्थी व नोकरदारांची खूप गैरसोय होत आहे. या बसने शारदाश्रम, ऍन्टोनिया डिसिल्वा शाळेतील विद्यार्थी प्रवास करतात. तसेच बेस्टची 162 क्रमांकाची बस करी रोड पुलाऐवजी चिंचपोकळी पुलावरून चालवली जात आहे. त्यात प्रवासाचा वेळ वाढल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या दोन्ही बसेस करी रोड पुलामार्गे शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यानापर्यंत पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांना नागरिकांची विनंती
एमएमआरडीए, महापालिका व वाहतूक पोलीस आदी यंत्रणांनी एल्फिन्स्टन पूल बंद करण्याआधी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन केले नाही. परिणामी, पादचारी व स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांच्या गैरसोयीच्या मुद्दय़ावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट बस क्र. 201 आणि 162 या बसेस चिंचपोकळी पुलाऐवजी करी रोड पुलावरून चालवण्याचा मुद्दा बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
Comments are closed.