मराठी आलंच पाहिजे असं कुठे लिहिलंय, एअरटेलच्या मुजोर महिला कर्मचाऱ्याला शिवसेनेने शिकवला ‘धडा’

मराठी का आलं पाहिजे? असं कुठे लिहिलं आहे, असं उद्दामपणे विचारून महिलेने मराठीतून बोलण्यास नकार दिल्याची संतापजनक घटना कांदिवलीत घडली. एअरटेल गॅलरीत ही महिला काम करते. ‘मराठी येणं गरजेचं नाही,’ असे म्हणणाऱ्या या मुजोर महिलेला आणि एअरटेल प्रशासनला शिवसेनेने चांगलाच धडा शिकवला. महाराष्ट्रात ग्राहक कायम ठेवायचे असतील तर वेळीच पावलं उचला नाहीतर एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला.

गेल्या काही महिन्यांपासून मुजोर परप्रांतीयांकडून मराठी भाषेचा अवमान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. चारकोपच्या एअरटेल गॅलरीत असाच प्रकार घडला. हिंदी भाषिक कर्मचारी महिलेने ग्राहकाशी मराठीत संवाद साधण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली. महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी आली पाहिजे असे कुठे लिहिले आहे? मला मराठी समजत नाही. त्यामुळे मी हिंदीतच बोलेन. इथे मराठी महत्त्वाची आहे असे मला वाटत नाही, असे म्हणत महिलेने ग्राहकाशी वाद घातला.

मुंबईत एकही गॅलरी दिसणार नाही

या घटनेनंतर शिवसेनेने एअरटेलवर धडक दिली. ‘एअरटेल प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावे, असा इशारा शिवसेनेने दिला. महाराष्ट्रात एअरटेलचे मराठी ग्राहक कायम ठेवायचे असतील तर योग्य पावले उचला नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही, पण मराठी भाषिक 80 टक्के कर्मचारी असायलाच हवेत,’ असा इशारा शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी दिला.

Comments are closed.