लोटे एमआयडीसीतील तो जीवघेणा प्रकल्प बंद केला नाही तर जनआंदोलन उभारू, शिवसेनेचा आक्रमक इशारा

इटलीतील नागरिकांसाठी जीवघेणी ठरलेली मिटेनी पीएएफएस उत्पादन रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही कंपनी तात्काळ बंद करा अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी दिला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात इटली सारख्या देशाने बंदी आणलेला प्रकल्प लोटे एमआयडीसी मध्ये सुरू करण्यात आला आहे. फोरएव्हर केमिकल म्हणून ओळख असलेली रसायने कंपनीत तयार केली जात होती. ही रसायने मानवी शरीरात आणि पर्यावरणात बराच काळ टिकून रहातात.त्यातूनच विविध आजार होत असतात म्हणून इटली सरकारने या कंपनीवर बंदी आणली आहे. शिवसेनेने निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मिटेनी एसपीए या रासायनिक कंपनीची यंत्रसामुग्री लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़च्या विवा लाईफ सायन्सेस या उपकंपनीने खरेदी करून रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीत वापरात आणली आहेत असे नमूद करताना हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात सुरू कसा झाला याबाबत शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे. हा प्रकल्प प्रदुषणकारी असून तो तात्काळ बंद करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, रत्नागिरी उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख सुभाष रहाटे, मयुरेश्वर पाटील, दिलावर गोदड,नगरसेविका फौजिया मुजावर, माजी नगरसेवक सलील डाफळे,रशिदा गोदड उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी सांगितले की, इटली सरकारने बंदी घातलेला प्रकल्प लोटे एमआयडीसीत सुरू करण्यात आला आहे. प्रदुषणकारी प्रकल्प हे कोकणात आणून त्याचावर प्रयोग केले जातात.हा जीवघेणा प्रकल्प असून तो तातडीने बंद करा. अन्यथा आम्ही जनआंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

Comments are closed.