शिव मंदिर किंवा समद थडगे?

उत्तर प्रदेशातील फतेपूर येथे भडकला धार्मिक वाद

वृत्तसंस्था/लखनौ

उत्तर प्रदेशातील फतेपूर येथील एका ऐतिहासिक वास्तूविषयी वाद भडकला आहे. ही वास्तू भगवान शंकराचे मंदिर आहे की अब्दुल समत मकबरा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी या वास्तूत हिंदूंनी प्रवेश करून प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला. विविध हिंदू संघटनांनी हे शिवाचे प्राचीन मंदिर असल्याने तेथे प्रार्थना आणि पूजपाठ करण्यासाठी अनुमती देण्याची मागणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीला मुस्लीम समुदायाकडून विरोध करण्यात आला आहे. सध्या या वास्तूच्या परिसरात कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी या वास्तूभोवती बॅरिकेडस् बसवले असून कोणालाही आत प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात कार्यरत असणाऱ्या ठाकूरजी शिवमंदिर संरक्षण समितीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक शाखेने, हे हिंदूंचे एक सहस्र वर्ष जुने धर्मस्थान असल्याचे प्रतिपादन केले आहे.

मंदिराचे रुपांतर मशिदीत?

या मंदिरात 1 हजार वर्षांहून अधिक काळ शिवाची पूचाआर्चा चालत असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत, असे हिंदू संघटनांचे प्रतिपादन आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मंदिराचे रुपांतर मशिदीत करण्यात आले आहे. हिंदूंच्या मंदिरावर अतिक्रमण करण्यात आले आहे, असा हिंदू संघटनांचा गंभीर आरोप आहे.

प्रशासनाला पूर्ण ज्ञान

ही वास्तू शिवाचे प्राचीन मंदिर आहे, हे जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे ज्ञात आहे. आतापर्यंत तसे स्पष्ट करण्यात आले नव्हते. याचा गैरफायदा मुस्लीम संघटनांनी घेतला आहे. टप्प्याटप्प्याने त्यांनी या वास्तूचे स्वरुप पालटले आणि त्याचा उपयोग मशिदीसारखा करण्यास प्रारंभ केला. आता ही मशिदच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, हिंदू आपला अधिकार सोडणार नाहीत. अशी माहिती फतेपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मुखलाल पाल यांनी पत्रकारांना दिली.

भाविकांचा प्रवेश

श्रावण सोमवारच्या निमित्ताने या वास्तूत शेकडो हिंदू भाविकांनी प्रवेश केला. त्यांना मुस्लिमांनी विरोध केल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. काहीजण या दगडफेकीत जखमी झाले. दगडफेकीमुळे दोन समाजांमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था आयोजित केली आहे.

मुस्लीम संघटनांचे म्हणणे

राष्ट्रीय उलेमा मंडळाने हिंदूंच्या प्रतिपादनाला विरोध केला आहे. ही मुस्लिमांची वास्तू असून शेकडो वर्षांपासून येथे मकबरा आहे. याचा शिवमंदिराशी काहीही संबंध नाही. या भूमीसंबंधी मुस्लीम संस्थांकडे कागदपत्रे आहेत. सरकारी कागदपत्रेही आहेत. काही हिंदू संघटना ही वास्तू हिंदू मंदिर असल्याचा दावा करीत आहेत. मात्र, मुस्लीम याविरोधात आंदोलन करतील. आम्ही ही वास्तू सोडणार नाही, असा इशारा मुस्लीम संघटनांनी या संदर्भात दिला आहे.

हे मंदिरच…

फतेपूर ग्रामीण भागात सदर कोतवाली येथे ही वास्तू आहे. ती शेकडो वर्षे जुनी आहे. येथे भगवान भोलेनाथ आणि भगवान श्रीकृष्ण यांची मंदिरे आहेत. या वास्तूच्या प्रत्येक आंतर्भागात या देवतांची चिन्हे असून अनेक पुरावे उपलब्ध आहेत. प्रशासनाकडेही हे पुरावे आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली.

Comments are closed.