पुण्यात बनावट नोटांचा छापखाना

बनावट नोटांचा छापखानाच पुण्यात उघडकीस आला असून, शिवाजीनगर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करीत 28 लाख 66 हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी उपस्थित होते. याप्रकरणी मनीषा स्वप्नील ठाणेकर (33), भारती तानाजी गवंड (34), सचिन रामचंद्र यमगर (35), नरेश भिमप्पा शेट्टी, प्रभु गुगलजेड्डी (35) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या पॅश डिपॉझिट मशिनमध्ये 200 रुपयांच्या 55 बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार 17 एप्रिलला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने  गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी मनीषा, भारती, सचिन यांना 18 एप्रिलला अटक केली. त्यांच्या चौकशीनुसार नरेशला ताब्यात घेत अटक केली.  गुगलजेड्डी याचाही गुह्यात सहभाग असल्याने त्यालाही अटक केले.

Comments are closed.