T20 WC26: हार्दिक नाही तर ‘हा’ आहे भारताचा हुकमी एक्का! केली ऑलराऊंडर कामगिरी

भारत विरुद्ध नेदरलॅंड्स संघांमध्ये बुधवारी (१८ फेब्रुवारी) टी२० विश्वचषक २०२६चा ३६वा सामना खेळला गेला. यामध्ये शिवम दुबेच्या उल्लेखनीय खेळीची चर्चा सुरू झाली. तो या स्पर्धेत एक प्रमुख पॉवर-हिटर म्हणून पुढे आला आहे. शिवमने पाकिस्तान आणि नामिबियाविरुद्ध छोटी पण महत्वपूर्ण खेळी केल्यानंतर नेदरलॅंड्सविरुद्ध त्याचे वेगळेच रुप दिसले. त्याने ३१ चेंडूत ६६ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले.

शिवम त्याच्या कारकिर्दीत दुसरा टी२० विश्वचषक खेळत आहे. त्याचे हे या स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक ठरले. तो स्पिनर्सविरुद्ध उत्तम फलंदाजी करतो, आता त्याने वेगवान गोलंदाजांविरुद्धही चांगले प्रदर्शन केले आहे. त्याचा प्रत्यय नेदरलॅंड्स विरुद्धच्या सामन्यात आला. त्याने लोगन वॅन बीकला तीन षटकार मारले.

आखूड चेंडू (शॉर्ट बॉल) विरुद्ध शिवमचा खेळ सुधारला आहे. याचे श्रेय त्याने आयपीएलला दिले. तो यामध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याच्या या सुधारणेबाबत तो म्हणाला, “माही भाईंनी मला सांगितले होते की त्या चेंडूवर षटकार मारणे आवश्यक नाही, तुम्ही चौकार मारू शकता किंवा एक धाव घेऊ शकता. म्हणून जेव्हा मी सुरुवातीला येतो तेव्हा माझ्या मनात नेहमीच ही गोष्ट असते”.

“टी२० मध्ये एखादा चेंडू वाया गेला की फलंदाजांवर दबाव येतो, पण एक-दोन चेंडू वाया गेले तरी चालेल, विकेट वाचवणे महत्वाचे. नंतर तुम्ही मोठा शॉट खेळत त्याची भरपाई करु शकता,” असेही शिवमने पुढे म्हटले. त्याच्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही सुधारणा दिसली. जेव्हा भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला नेदरलॅंड्सविरुद्ध शेवटचे षटक टाकण्यास दिले, तेव्हा दिसले.

“मला वाटले आज माझा दिवस आहे. त्यामुळे थोडा सांभाळून खेळत पुढे जाण्याचा प्रयत्न होता. मला स्वत:वर विश्वास असून ताकदही आहे. त्यामुळेच मला पॉवर-हीटर म्हणतात वाटते”, असेही शिवमने म्हटले.

सूर्यकुमारने शिवमला जसप्रीत बुमराह असूनसुद्धा २० व्या षटकात गोलंदाजी दिली. त्यामध्ये नेदरलॅंड्सला जिंकण्यासाठी २८ धावा पाहिजे होत्या. त्याने १० धावा दिल्या. तसेच त्याने या सामन्यात ३ षटकात ३५ धावा देत २ विकेट्सही घेतल्या. यामुळे त्याने प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला.

Comments are closed.