मास्क, टोपी अन् अपर बर्थ; वर्ल्डकप जिंकल्यानंतर शिवम दुबेचा पत्नीसह ‘सयाजी एक्सप्रेस’ने प्रवास; टीसी समोर आल्यावर काय घडलं?
आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये हिंदुस्थानने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले. या विजयानंतर हिंदुस्थानी संघातील खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. रविवारी 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या एकतर्फी लढतीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावला. त्यानंतर हिंदुस्थानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला आणि सर्व खेळाडू कुटुंबासह आपापल्या घराकडे निघाले. सर्व खेळाडू विमानाने आपापल्या घरी परतले, मात्र एक खेळाडू चक्क पत्नीसह रेल्वेने आपल्या घरी आल्याचे समोर आले आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तळाला फलंदाजीला येऊन धावांचा पाऊस पाडणारा शिवम दुबे पत्नीसह अहमदाबादहून मुंबईला परतला आहे. हिंदुस्थानच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा दुबे विमानाने नाही तर चक्क सयाजी एक्सप्रेसने मुंबईला आल्याचे समोर आले आहे. मैदानात गोलंदाजांचे वाभाडे काढणारा दुबे वर्ल्डकप जिंकल्यानंतर अवघ्या काही तासांत ‘अहमदाबाद-मुंबई सयाजी एक्सप्रेस’च्या 3-टायर एसी डब्यात वरच्या सीटवर रेल्वेची जाड चादर ओढून शांतपणे झोपला होता. या डब्यातील इतर प्रवाशांना संशयही आला नाही की आपल्या बाजूला वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बसला आहे. याबाबत त्याने स्वत: माहिती दिली असून ओळख लपण्यासाठी काय काय जुगाड करावा लागला हे देखील त्याने सांगितले आहे.
फायनलमध्ये अवघ्या 8 चेंडूत 26 धावा कुटणाऱ्या शिवमला सामना संपल्यानंतर आपल्या कुटुंबाला, विशेषतः 4 वर्षांचा मुलगा अयान आणि 2 वर्षांच्या मुलीला भेटण्याची ओढ लागली होती. पण अहमदाबादमधील सर्व विमानं हाऊसफुल्ल होती. अशात रस्ते प्रवासापेक्षा ट्रेन जलद पडेल म्हणून शिवमने पत्नी अंजुम आणि एका मित्रासह गुपचूप रेल्वेचे तिकीट काढले. स्टेशनवर चाहत्यांची गर्दी पाहून शिवमने आपला चेहरा मास्क आणि टोपीने पूर्णपणे झाकून घेतला होता. गाडी सुटण्याच्या फक्त 5 मिनिटे आधी तो कारमधून उतरून थेट डब्यात शिरला आणि गुपचूप अपर बर्थवर जाऊन बसला.
Comments are closed.