सत्ताधाऱ्यांना जिवापेक्षा ‘बिझनेस’ महत्त्वाचा घोषणाबाजी, विरोधकांचा सभात्याग
महापालिकेच्या सभेत चेंबूर झाड दुर्घटनेचा विषय घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी रस्त्याचा ‘अर्जंट बिझनेस’ सभागृहात आणला. बहुमताअभावी पोल नाकारण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली. याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.
गुरुवारच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी चेंबूरचा विषय प्रथम घेतला नाही. त्यांनी घाटकोपर येथील एका रस्ता रेषेबाबतच्या प्रस्तावाला तातडीच्या कामकाजात (अर्जंट बिझनेस) आणले. या अर्जंट बिझनेसवर विरोधकांनी पोल मागितले. मात्र विकासाचे प्रस्ताव सभेत पारित करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे दोन तृतीयांश संख्या नसल्याने, बहुमत चाचणी घेत असतानाच महापौरांनी अचानक निर्णय रद्द केला आणि तो विषय पुन्हा विशेष सभेत घेण्याची घोषणा केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेपेक्षा आर्थिक बाब महत्त्वाची वाटते, असा आरोप विरोधकांनी केला.
चेंबूरमधील झाड दुर्घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर, या घटनेच्या चौकशी अहवालात चौकशी समितीने कंत्राटदार, उद्यान खाते, अभियंते, सल्लागार आदींना क्लीन चिट दिली. फक्त कंत्राटदार व सल्लागार यांना सात लाख रुपये दंड केला. यावर सुरुवातीलाच चर्चा घेतली नसल्याने विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी निषेध व्यक्त केला. विरोधकांनी ‘पोल घ्या, पोल घ्या’ अशा घोषणा दिल्या. मात्र महापौरांनी बिझनेसला महत्त्व देत प्रस्ताव वाचण्यास सुरुवात केल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
Comments are closed.