Shivsena UBT Maharashtra Politics name in discussion for leader of opposition


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी (3 मार्च) विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहीर करू शकतात. पण, या नावाबाबत ठाकरे गटाने कमालीची गुप्तता पाळली असली तरी या पदासाठी पक्षातील आक्रमक चेहरा म्हणून आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. (Shivsena UBT Maharashtra Politics name in discussion for leader of opposition)

हेही वाचा : SC : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; दोन महिला न्यायाधिशांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचे आदेश 

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. पण, आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे 20 आमदार निवडून आले. त्यामुळे ठाकरे गटाकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यात येणार आहे. पण, शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे डिसेंबरमध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाला दावा करता आला नव्हता. आता पुढील आठवड्यात 3 मार्चपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची शुक्रवारी ‘मातोश्री’ वर बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेनातील पक्षाची रणनिती आणि विरोधी पक्षनेतेसंदर्भात चर्चा झाली. सुमारे तासभर ही चर्चा झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव सुचवावे, असे उपस्थित आमदारांना सांगितले. मात्र, त्यांनी कोणाचे नाव सुचविण्याऐवजी पक्षप्रमुख म्हणून आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे मत आमदारांनी व्यक्त केले.

ठाकरे गटात विरोधी पक्षनेता कोण होणार, यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी ठाकरेंनी एका पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि विधानसभेचे गटनेते भास्कर जाधव या दोन नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाला पसंती मिळण्याची जास्त शक्यता आहे. जाधव हे गेली अनेक वर्षे विधिमंडळात काम करीत आहेत. विधिमंडळाचे कायदे, नियम याची त्यांना जाण असून पक्षाचा आक्रमक चेहरा, अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख आहे. कोकणात पक्षाला लागलेली गळती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब करू शकतात. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते म्हणून कोणाच्या नावाची चर्चा झाली नसली तरी उद्धव ठाकरे हे सोमवारी नाव घोषित करणार आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांकडे पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यापूर्वी ठाकरेंच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना विश्वासात घेतले जाणार आहे.



Source link

Comments are closed.