सिंहस्थाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत त्यांच्या जमिनी उपऱ्यांना देणार काय? संजय राऊत यांचा संतप्त सवाल

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी पावलापावलावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत त्यांच्या जमिनी उपऱ्यांना देण्याचा सरकारचा डाव आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत प्रत्येक पावलापावलावर भ्रष्टाचार सुरू आहे. सुमारे 15- 20 हजार कोटींचे बजेट गुजरातच्या ठेकेदारांना वाटायचे आहे. त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांवर मेहेरबानी केल्यासारखी कामे वाटायची आहेत. देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांचे सध्या हे काम सुरू आहे. त्यासाठी दडपशाही सुरू आहे.

आपल्याकडे काही त्या भागातील शेतकरी आले होते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सिंहस्थाच्या नावाखाली विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याची प्रत्यक्षात गरज नाही. या विस्तारकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या जमिनी ताब्यात घेत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या अधिकृत घरांवर, त्यांच्या व्यवसायांवर बुलडोझर फिरवत आहे. या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांना बेघर आणि उद्ध्वस्त करण्यात येत आहे. याविरेधात शेतकरी उपोषणाला बसले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. अशी परिस्थिती असताना राज्यात सर्व आलबेल सुरू आहे, कोणावरही अन्याय होत नाही, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस करत आहे.

सोलापूरमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील 13 ते 16 गावातील शेतकरी उपोषणाला बसले आहेत. प्रत्यक्षात रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज नाही. सिंहस्थ येईल आणि जाईल. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना का उद्ध्वस्त करण्यात येत आहे. त्यांची घरं, व्यवसाय, जमीनी ताब्यात घेत, त्या उपऱ्यांना देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही पालकमंत्री गिरीष महाजन तेथे गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकले आहेत. शेतकऱ्यांचे कोणीही ऐकत नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाचा डाव आखला जात आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

Comments are closed.