आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, तरीही ते पळून गेले नाहीत! संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले

गद्दारी, बेईमानी, मोदी- शहा यांची चापलूसी करणाऱ्यांना दिघे साहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे खडवासत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना चांगलेच फटकारले आहे. ठाणे हे शिवसेनेचे, हिंदूहृदयसम्राट, शिवसनेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आहे. मिंधेचा इथे प्रश्नच नाही. काल आपण केलेले वक्तव्य अत्यंत जबाबदारीने केले आहे. त्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या, त्या लागल्या आहेत. त्यांनी दिघे साहेबांचा फोटी मोदींपेक्षा मोठा लावावा. मोदी यांना मोठे ठरवणे किंवा बाळासाहेबांना छोटे ठरवणे ही भाजपची रणनीती आहे. काल ज्यांनी आपला निषेध केला, त्यांचे आपण स्वागत करतो. निषेध करणारे सर्व गद्दार आहेत. या गद्दारांना निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्रधर्माचे पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

आता गद्दार दिघे यांच्या नावाने राजकारण करत आहे. आनंद दिघे यांनी व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, शहा-मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांना शिवसेना कधीही विकली नाही. त्यांच्यावर अनेक संकटे आली, त्यांना टाडाही लागला होता. मात्र, त्यांनी शेपूट घालून गांडूंसारखे पलायन केले नाही, हे गद्दारांनी लक्षात ठेवावे. आनंद दिघे ठाकरे आणि शिवसेना परिवाराचे महत्त्वाचे सदस्य आणि घटक आहेत. त्यांनी ठाकरे परिवाराचा आदेश कधीही मोडला नाही. त्यांनी सातत्याने मातोश्रीशी निष्ठा कायम ठेवली होती. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध होते. आता आजच्या या पोराटोरांनी इतिहास माहिती नाही, असेही ते म्हणाले.

आनंद दिघे जिथे काम करायचे, तो आनंद आश्रम ती पॉप्रर्टी कोणाच्या नावावर करून घेण्यात आली आहे, याचा तपास करा. दिघे साहेबांच्या वेळी तो ट्रस्ट होता. दिघे साहेब तिथे काम करत होते. आता ती पॉप्रर्टी म्हणून कोणी धमक्या देत कोणी कोणाच्या नावावर करून घेतली आहे, याचा तपास करा. दिघे साहेबांनी असे उद्योग कधीच केले नाही. ते व्यापारी नव्हते. त्यांनी शिवसेनेचा व्यापर केला नाही. तसेच त्यांनी स्वतःला कोणतेही पद पाहिजे, अशी कोणतीही मागणी केली नाही. ते राज्यातील आदर्श जिल्हाप्रमुख असल्याचे बाळासाहेब नेहमी भाषणात सांगायचे. दिघे साहेब होते, तो काळ वेगळा होता. त्यावेळी उपनेते, नेते अशी पदे नव्हती. नेते आणि नंतर जिल्हाप्रमुख अशी रचना त्यावेळी होती. त्यामुळे आपल्या वक्तव्याने कोणाच्याही पोटात दुखण्याचे कारण नाही. गद्दारी, बेईमानी, मोदी- शहा यांची चापलूसी करत दिघे साहेबांचे जे अवमूल्यन करत आहेत, ते थांबवा, तर दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभेल, असे राऊत म्हणाले.

राजन विचारे यांनी मोलाचा त्याग केल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले होते. त्यासाठी मिंधे यांनी रोज विचारे यांचे पाय धूत तीर्थ प्राशन केले पाहिजे. राजन विचारे सभागृह नेते होते. शिंदेच्या घरात दुर्घटना घडल्याने, ते सैरभेर झाले होते, दुःखात होते. त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी विचारे यांनी आनंद दिघे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवली की, त्यांच्या घरात दुर्घटना घडल्याने ते दुःखात आहेत. आपण त्यांना सभागृह नेते करून आपल्या कार्यात सहभागी करून घेऊ. त्याला दिघे आणि उद्धव साहेबांनी मान्यता दिली. राजन विचारे यांच्या त्यागामुळेच आज शिंदे आहेत. आज ते आम्हाला काय निष्ठेच्या गोष्टी सांगत आहेत. काल रस्त्यावर उतरलेल्या या लफंग्या मुलांना आनंद दिघे यांच्याबाबत काय माहिती आहे. राजन विचारे, सतीश प्रधान यांच्याबाबत काय माहिती आहे. काल निषेधासाठी उतरले ती सर्व ठेकेदारांची मुले, लाभार्थी होते, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे श्रेय अशा पोराटोरांना कोणी देऊ नये, त्यांना शिवसेनेने दोनवेळा कल्याण-डोंबिवलीतून खासदार केले आहे. त्यांचे काय कतृत्व होते. त्यामुळे त्यांनी माझ्या नादाला लागू नये. आपल्या निष्ठा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी कायम आहेत. ज्यांनी ठाकरे परिवाराशी गद्दारी केली, त्यांनी आपल्याबाबत काहीही बोलू नये. कालच्या आंदोलनासाठी आपल्याला शिव्या देण्यासाठी त्यांनी 5-50 लाख खर्च केले असतील. त्यांचे तेच काम आहे. शिंदे डरपोक आहेत, त्यांना घेरण्याची काय गरज आहे. गद्दार त्यांच्या कर्माने संपणार आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

ठाण्यात भगवा झेंडा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावला. त्यात मिंधेचे काय योगदान आहे. त्यांना आनंद दिघे यांचे नाव घेण्याचे अधिकार नाही. शिवसेनेचा प्रोटोकॉल आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांएवढा कोणीही नाही. आमचाही फोटो त्यात नसेल. स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा असा फोटो लावू देणार नाही. मोदी-शहा यांना बाळासाहेबांचे टोलेजंग नेतृत्व कमी करण्यासाठी त्यांनी अशी प्रतीके तयार केली आहे. हे आनंद दिघे यांनाही मान्य झाले नसते. मिंधे यांनी दिघे साहेबांच्या समाधीसमोर आत्मचिंतन करावे, म्हणजे त्यांनी किती मोठी चूक केली असेल ते त्यांना समजेल.

शिवसेना चोरून ते आमच्यासमोर उभे आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा, स्वतःचे चिन्ह घ्यावे आणि आमच्यासमोर यावे. जनताच त्यांचा पालपाचोळा करेल. शिवसेना चोरलेल्यांनी आमच्या नादाला लागू नये, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

Comments are closed.